
नांदेडमधून बेपत्ता झालेल्या त्या चार कोरोनाग्रस्त रुग्णांविरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
नांदेडहून पंजाबला गेलेल्या रुग्णांचा पंजाबमध्ये आकडा वाढत असतानाच नांदेड जिल्हा प्रशासनाने लंगर साहिब गुरुद्वारामधील काही कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतले होते. त्यातील वीस जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांना एनआरआय यात्री निवासात ठेवण्यात आले होते. त्यातील सर्वजण तेथून निघून गेले होते. त्यापैकी सोळा जणांना 3 मे रोजी परत त्याठिकाणी आणण्यात आले व तेथे उपचार सुरू झाले. मात्र अन्य चार जण बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू होती. ते सापडून न आल्याने आज अखेर महापालिकेचे तंत्रज्ञ सहायक सूदर्शन अदमनकर यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात या विषयी तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलिसांनी त्या चार बेपत्ता रुग्णांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. भादंविच्या 269,270 आपत्ती व्यवस्थापन कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चार रुग्णांच्या बेपत्ता होण्याने प्रशासनात चिंता वाढली आहे. नोंदणी करताना हलगर्जीपणा दाखविण्यात आला तसेच त्यांचे पत्ते देखील नीट नोंदवून घेण्यात आले नाहीत, अशी माहितीही समोर येत आहे. महापालिकेच्या गलथान कारभारामुळे हे रुग्ण बेपत्ता झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस निरीक्षक संदीप शिवले हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.































































