चव्हाणांचे आगमन अन् नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींचा राजीनामा, चर्चांना ऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

लोकसभा निवडणुकीच्या नंतर महापौर शिलाबाई किशोर भवरे यांच्या राजीनाम्याची चर्चा असतानाच आज दुपारी नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बी.आर. कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधकाकडे सादर केला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे आगमन आणि कदम यांचा राजीनामा यामुळे राजकीय चर्चेला ऊत आला आहे.

तीन वर्षापूर्वी नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होऊन काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनलने यात बहुमत मिळविले होते. त्यावेळी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष बी.आर.कदम यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी सभापती पदाची जबाबदारी सोपविली होती. मात्र निवडणुकीनंतर काही संचालकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली होती. यानंतर बी.आर. कदम यांनी तीन दिवसापूर्वीच खासदार अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली होती. त्यात त्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानुसार आज दुपारी बी.आर.कदम यांनी आपल्या सभापती पदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधकाकडे सादर केला. याबाबत बोलताना बी.आर. कदम म्हणाले की, गेल्या तीन वर्षात एकंदर कामकाज, शेतकरी हिताचे निर्णय आपल्या काळात घेण्यात आले. बाजार समितीच्या परिसरात सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च विविध प्रकारची विकास कामे करण्यात आली. आपल्या स्वनिधीतूनच कामे करताना आपल्या कार्यकाळात तब्बल साडेतीन कोटी रुपयांची बँकांमध्ये गुंतवणूक करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आस्थापना खर्च नियंत्रित असताना शासनाने घालून दिलेल्या मर्यादेचे पालन करुन इलेक्ट्रॉनिक काटे, हमाल मापाडी स्वच्छतगृहे, ई-लिलाव, गाळ्यांचे बांधकाम आदी कामे करण्यात आली.