
भाजप उमेदवारांच्या बेताल वक्तव्यांचा धडाका सुरूच आहे. काहीच दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक यांनी जाहीर सभेत लाडकी बहीण योजनेवरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आता नांदेड जिल्ह्यातील किनवट मतदासंघाचे भाजपचे उमेदवार भीमराव केराम यांनी रोज रोज गावात येऊन तुमचे काय मुके घ्यायचे का? असे बेताल वक्तव्य केले आहे.
किनवट मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार भीमराव केरम यांच्या प्रचारासाठी सोमवारी बोधडी येथे पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलत असताना भीमराव केराम यांनी बेताल वक्तव्य केले. भीमराव केराम गावात फिरकले नाहीत अशी टीक ग्रामस्थांच्या माध्यामातून होत होती. यावरून भीमराम केराम म्हणाले की, गावात येऊन काय मुके घ्यायचे का? मंत्रालयात वेळ देऊन गावासाठी निधी आणण्याचे काम मी करतो, असे अत्यंत बेजबाबदार वक्तव्य भीमराव केराम यांनी केले. भीमराव केराम यांच्या या बेताल वक्तव्यामुळे मतादारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. भीमराव केराम यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नांदेड किनवट मतदारसंघात भीमराव केराम यांच्या समोर महाविकास आघाडीच्या प्रदिप नाईक यांचे तगडे आव्हान आहे.

























































