नांदेड – गावठी पिस्तुल खरेदीविक्री प्रकरणी चार जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात गेल्या सहा महिन्यात गावठी पिस्तुल वेगवेगळ्या व्यक्तीकडून जप्त करण्यात आल्या होत्या. त्यानुषंगाने माहिती संकलित करुन नांदेड शहरात काही इसम गावठी पिस्तुल खरेदी व विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती नांदेड पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी आज सापळा रचून चार आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून सात गावठी पिस्तुल व 116 जिवंत काडतूस जप्त केले आहेत.

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या सहा महिन्यापासून नांदेड शहरात गावठी पिस्तुल येत आहेत. याबाबत काही जणांना अटकही करण्यात आली होती. मात्र परराज्यातून येणार्‍या या टोळीचा शोध काही लागू शकला नव्हता. सहा महिन्यात पकडलेल्या आरोपींची पोलीस कोठडी व त्यांच्याकडून विचारपूस केल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेने याचा अभ्यास केला. त्यानुसार सायबर सेल, स्थानिक गुन्हा शाखा व अन्य यंत्रणांचा वापर करुन पाळत ठेवली. नांदेड पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आज याबाबतचे काही आरोपी गावठी पिस्तुल खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी नांदेडला येत असल्याचे कळाले. त्यानुसार वाघी ते नाळेश्वर जाणार्‍या रस्त्यावर पोलिसांनी साध्या वेशात व अन्य यंत्रणेसह सापळा रचला.

आरोपी आल्याचा सुगावा लागताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. तेव्हा त्यांनी पोलिसांवर हल्ला चढविला. मात्र पथकात अधिकारी व पोलीस कर्मचारी जास्त असल्याने ते तग धरु शकले नाहीत. आरटीओ ऑफिसजवळ त्यांना पकडण्यात आले. यातील आरोपी कमलेश उर्फ अशू लिंबापुरे (23 रा.वसरणी नांदेड), बलबिरसिंघ उर्फ शेरा जाधव (21 रा.गुरुरामदास यात्री निवास हिंगोली गेट नांदेड), शेख शहाबाज शेख शकील (23 रा.रहिमपूर नांदेड), शामसिंघ उर्फ शाम्या मठवाले (23 रा.गुरुव्दारा गेट नं.2 नांदेड) या चौघांना पोलिसांनी आज पकडले. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडून सात गावठी पिस्तुल व 116 जिवंत काडतूसे असा तीन लक्ष तीन हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

पोलीस अधीक्षक कोकाटे म्हणाले की, सदर आरोपींनी हैद्राबाद येथे आशिष सपुरे व रबज्योतसिंघ उर्फ गब्या (रा.नांदेड) यांना मोठ्या प्रमाणात गावठी पिस्तुल पुरविण्याचे कटकारस्थान रचले. सपुरे व गब्या हे दोघेही या चारही आरोपींना पैसे पुरवित असल्याचे कोकाटे यांनी सांगितले. सदरची कामगिरी स्थागुशाचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, सहायक पोलीस निरीक्षक रवी वाव्हुळे, सहायक पोलीस निरीक्षक पांडूरंग माने व त्यांच्या सहकार्‍यांनी यशस्वी केल्याचे कोकाटे यांनी सांगितले. या सर्वांचे कोकाटे यांचे अभिनंदन केले आहे.