नांदेड येथे अल्पवयीन मुलीवर शिक्षकांकडून लैंगिक अत्याचार

503

नांदेड येथील माध्यमिक विद्यालयातील सातवीच्या अल्पवयीन मुलीस मोबाइलमधील अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर शाळेतच लैंगिक अत्याचार केल्याचा लाजिरवाण प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोन शिक्षकांसह प्राचार्य, मुख्याध्यापक व स्वयंपाकी महिला अशा पाच जणांविरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़. यात सहशिक्षक सय्यद रसूल, दयानंद राजुळे, प्राचार्य शेळके, मुख्याध्यापक प्रदीप पाटील, स्वयंपाकी सुरेखाबाई बनसोडे अशी या पाच जणांची नावे आहेत.

दोन महिन्यांपूर्वी श्री साईबाबा माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक रसूल सय्यद व दयानंद राजुळे यांनी पीडित मुलीस सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नृत्याचे व्हिडीओ दाखविण्याच्या बहान्याने अश्लील व्हिडीओ दाखविले होते. मुलीने संबंधित प्रकार तिच्या आईला सांगितल्यानंतर आईने दोन महिन्यांपूर्वी शाळा गाठून मुख्याध्यापकांकडे तक्रार केली होती. परंतु त्यावेळी मुख्याध्यापक व इतरांनी काहीही कारवाई न करता पीडित मुलीच्या आईला घरी पाठवून दिले. तसेच ही बाब कोणासही न सांगण्याच्या अटीवरून अल्पवयीन मुलीच्या आईकडून शपथपत्र लिहून घेतले होते. पीडित मुलीची आई मजुरी करते़ मुलीच्या बदनामीच्या भीतीने त्याही शांत राहिल्या होत्या. मात्र या बाबत गावात चर्चा सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांनी पीडित मुलीच्या आईला ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला त्यांनतर हा प्रकार समोर आला.

या प्रकरणी शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी नांदेड पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांना पत्र पाठवून मनोधैर्य योजने अंतर्गत पिडीत मुलीला मदत मिळण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात मुख्यध्यापकांनी पीडित मुलीच्या आईचा अशिक्षीतपणा बघून त्यांचे बॉण्डवर शपथपत्र घेतले असून ते नोटरी देखील केले आहे. याबाबत नोटरी यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई करावी असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले आहे. तसेच संबंधित आरोपी आणि त्य़ांना मदत करणारे मुख्याध्यापक, पदाधिकारी यांचा बडतर्फीचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात यावा असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या