
सामना प्रतिनिधी । नांदेड
गेली अनेक वर्ष आघाडीचा धर्म पाळत आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले. मात्र पक्षातील राहू-केतूमुळे पक्ष अडचणीत येऊ लागला. यामुळे कार्यकर्त्यांशी संवाद साधून आपण राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला असून, यापुढे कुठल्याही पक्षात जायचे आणि कुठून निवडणूक लढवायची याबाबत निर्णय घेतला नाही, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी येथे व्यक्त केली.
जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातील मनोगतानंतर त्यांनी हा आपला निर्णय त्यांच्यासमोर व त्यानंतर पत्रकारांसमोर जाहीर केला. काँग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी असताना आपण आघाडीचा धर्म पाळला. मात्र काँग्रेसच्या काही गद्दारांनी आपल्याला निवडणुकीत पाडले. अशाही परिस्थितीत लोकसभेच्या निवडणुकीत आपण आघाडी धर्म पाळला, मात्र संशयीवृत्ती असलेल्या मंडळींनी आमच्यावरच पाळत ठेवल्याने आम्ही संभ्रमीत झालो. कार्यकर्त्यांनी जे काय करायचे ते केले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी पक्षातील काही मंडळींनी मॅनेज करुन निरीक्षक पाठविले. त्यामुळे आपण या बैठकीकडे पाठ फिरविली. जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा आपण यापूर्वीच पक्षाकडे सोपविला आहे. पक्षात असलेले राहू-केतू यामुळे पक्षाची वाट लागली आहे. अशाही परिस्थितीत आमच्या बालेकिल्ल्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आम्ही यश मिळविले.
आमदार अमिता चव्हाण यांनी केलेल्या आरोपाचा उल्लेख करुन ते म्हणाले की, कुणी कुणाला पाडले, याचा विचार त्यांनीच करावा. विधानसभेच्या निवडणुकीत माझ्या विरोधात प्रचार करताना त्यांना आघाडीचा धर्म का दिसला नाही, असा थेट सवाल त्यांनी करुन त्यांच्याच पक्षातील मंडळींनी काँग्रेसच्या विरोधात प्रचार केल्याचा आरोप गोरठेकर यांनी केला.
अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या घोटाळ्यात नांदेडचे दोन्ही राष्ट्रवादीचे आमदार सामील असल्याचा आरोप गोरठेकरांनी करुन या राहू-केतूंनी पक्षाचीही वाट लावली. होय, नांदेड जिल्हा परिषदेच्या दलितवस्तीचा 35 कोटींचा निधी आम्ही अयोग्य वाटप झाल्यामुळे मुख्यमंर्त्यांना भेटून आम्ही तो रोखला. कार्यकर्त्यांची होत असलेली घुसमट, त्यांच्यावर होत असलेले अन्याय, आघाडीचा धर्म न पाळता सुडबुध्दीचे झालेले राजकारण यामुळे आपल्याला याबाबी खटकल्या. गेल्या दहा वर्षात झालेली कार्यकर्त्यांची घुसमट लक्षात घेता आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
आज आपण राष्ट्रवादी सोडली, अशी घोषणाच त्यांनी करुन यापुढे कुठल्या पक्षात जायचे, कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची, याचा निर्णय लवकरच घेऊ. भोकरमधून निवडणूक लढविणार काय? असा प्रश्न त्यांना केला असता त्यांनी भोकरच काय महाराष्ट्रातून कुठूनही निवडणूक लढविण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी सांगितले. मी कुठल्याही परिस्थितीत आमदार होणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गोरठेकर यांनी राष्ट्रवादी सोडल्यामुळे जिल्ह्यात मात्र एकच खळबळ उडाली आहे.

























































