दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांना नांदेडमध्ये अटक, चौघे फरार

565

असर्जन चौक ते हस्सापूर रस्त्यावर मंगळवारी मध्यरात्रीनंतर दरोड्याच्या किंवा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीवर पोलिसांना गोळीबार करावा लागला. यात पाठलाग करून पोलिसांनी पाच जणांना अटक केली. तर अन्य चार जण तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले.

मंगळवारी रात्री स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस पथक गस्त घालत असताना एका मोटारसायकलवर तीन संशयित व्यक्ती गोवर्धनघाट पुलाजवळ दिसल्या. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते पळाले. संशयित व्यक्ती असर्जन चौक ते हस्सापूर रस्त्यावर आले. त्यांच्यामागे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस पथक होते. तेथे थांबून त्यांनी पोलीस पथकाला परत जा, नाही तर तुमच्यावर आम्ही गोळीबार करू, अशी धमकी दिली. तेव्हा स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील चंद्रकांत नाईक यांनी आपल्या शासकीय पिस्तुलातून दोन गोळ्या हवेत झाडल्या आणि त्यानंतर इंद्रपालसिंग उर्फ सन्नी किरतसिंग मेजर (29, रा.चिखलवाडी), हरजितसिंग उर्फ सोनू उर्फ पीनीपाना सतनामसिंग वाधवा (30, रा.गुरुव्दारा गेट क्र .5), राजूसिंग नानकसिंग सरदार (32, रा.असर्जन), सय्यद सलीम सय्यद रफी (31, रा.आश्रफनगर, हिंगोलीगेट), नागराज उर्फ नाल्या राजू चव्हाण (27, रा.दत्तनगर, नांदेड) या पाच जणांना पोलीस पथकाने पकडले. याप्रसंगी तेथे हजर असलेले इतर चार अब्दुल रझीम अब्दुल लईम (रा.नई आबादी), मोहंमद वाजीद मोहंमद गौस, टिपू उर्फ सुलताना (रा. गोकुळनगर) आणि शब्बर बेग गब्बार बेग (रा. देगलूर नाका) हे चार जण पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे सुनील नाईक यांनी लिहिलेल्या तक्रारीत नमूद आहे. या लोकांकडून एक पिस्टल, एक जिवंत काडतूस, एक धारदार खंजर, दोरी आणि एक मोटारसायकल पकडण्यात आली. हे नऊ जण कोणता तरी गंभीर गुन्हा किंवा दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

नांदेड ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास नांदेड ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक शेख जावेद करीत आहेत. फायरिंगची घटना घडल्यावर या घटनेतील गांभीर्य लक्षात घेता नांदेडचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड, पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक सोनाबाई कदम यांनी त्वरित घटनास्थळाला भेट दिली आणि घडलेल्या प्रकाराचे परीक्षण केले. स्थानिक गुन्हा शाखेने एका आठवड्यात 399 प्रमाणे दाखल केलेला हा दुसरा गुन्हा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या