
नांदेड शहर व जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी पावसाने धुमाकूळ घातला असून मागील तीन तासात जिल्ह्यात 132.70 मि.मी. पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस कंधार तालुक्यात 236 मि.मी. झाला आहे. जिल्ह्यातील 69 मंडळात ढगफुटी सदृश्य पावसाची नोंद झाली असून, कंधार तालुक्यातील माळाकोळी सर्कलमध्ये 284.50 मि.मी. पाऊस झाला आहे. विष्णुपुरी प्रकल्पाचे 11 दरवाजे उघडण्यात आल्याने पाच तालुक्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शहरातील 22 वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून, अनेक व्यापारी पेठातील दुकानांमध्ये पाणी साचले आहे. नावघाट पुलावरुन पाणी जात असून जिल्ह्यातील अनेक रस्ते पावसामुळे बंद आहेत. जवळपास सहा हजार लोकांना जिल्ह्यातून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. सर्वच नद्यांना पूर आला असून दुर्दैवाने तिघांचा यात मृत्यू झाला आहे. तसेच शेकडो जनावरे या पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत.
नांदेड जिल्ह्यात तीन दिवसांपासून आभाळ फाटल्याची स्थिती आहे. प्रचंड गडगडणार्या नभातून तुफानी कोसळणार्या मुसळधार मेघांनी शुक्रवारी देखील अक्षरशः धुमाकूळ घालत हाहाकार माजवला आहे. पाण्याची पातळी वाढल्याने विष्णुपुरी प्रकल्पाचे 11 दरवाजे उघडण्यात आले असून गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शहरासह जिल्हाभरात धो धो पाऊसधारा सुरू असल्याने चिंता वाढली असून अनेक घरांसह सखल भागात पाणी शिरले आहे. पुरामुळे हजारो हेक्टर शिवारातील पिके मातीसह खरडून गेल्याने शेतीची अतोनात हानी झाली आहे. मोसमातला मोठा जलप्रकोप ठरलेल्या या अस्मानी संकटाने अनेक गावांचा संपर्क अद्यापही बाधित आहे. दरम्यान जिल्ह्यात शैक्षणिक सुट्टी देण्यात आली असून जलप्रलयाचे दाटलेले संकट बघता जिल्ह्यासाठी सैन्य दलाला पाचारण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिली आहे.
विष्णुपुरी प्रकल्पाचे 11 दरवाजे उघडले
तीन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे शुक्रवारी सकाळी शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे 11 दरवाजे उघडण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. यामुळे गोदापात्रात पाण्याचा मोठा विसर्ग होत असून, गोदावरी नदी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरी काठोकाठ भरून वाहत असून आमदुरा बंधार्याच्या बॅक वॉटरमुळे पुलावरून पाणी जात असल्याने गुरुवारी दुपारपासून नांदेड तालुक्यातील राहेगावचा संपर्क तुटल्याची माहिती समोर आली आहे. नांदेड तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व पोलीस यंत्रणा तेथील सरपंच व नागरिकांच्या संपर्कात आहेत.
1983 पेक्षाही भयंकर परिस्थिती
1983 साली आलेला पूर आमच्या डोळ्यांनी पाहिला. पण 1983 पेक्षाही आज आलेली पुराची परिस्थिती ही भयंकर आहे. या पुरामुळे काही दिवसानंतर हातात येणार्या खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पुरामुळे आमच्या शेतातील सर्वच वाहून गेले. शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. शासन व प्रशासनाने पंचनामे करण्यात वेळ वाया न घालता सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेळगाव (थडी) येथील ज्येष्ठ शेतकरी मारोती लिंगमपल्ले यांनी केली आहे.