नांदेडमध्ये 24 तासात नऊ शेतकऱ्यांना सर्पदंश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुखेड

गेल्या 24 तासात नऊ शेतकऱ्यांना विषारी सापाने दंश केल्याने मुखेडमध्ये खळबळ उडाली आहे. सर्पदंश झालेल्या सर्व शेतकऱ्यांना पुढील उपचारांसाठी मुखेड येथील सर्पतज्ञ डॉ. दिलीप पुंडे यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. पुंडे यांनी सर्व शेतकऱ्यांवर तातडीने उपचार केल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. बब्रूवान बोडके (40), जिजाबाई वडजे (42), रब्बानी मौला, लक्ष्मण घाडगे (45), अशोक घारगे (30), निर्मलाबाई मोहन पल्ले, बाबुराव दडले, सखाराम घाटकर (65), सुमनबाई गोजे अशी रुग्णांची नावे आहेत.

मराठवाड्यात पावसाने कृपादृष्टी दाखविल्याने सर्वत्र पिके बहरली आहेत. यामुळे शेतकरी पिके फवारणीसाठी कंबरेपर्यंत वाढलेल्या पिकात जाऊन फवारणी, मशागत करीत आहे. दरम्यान अशाच प्रकारचे शेती काम करणाऱ्या वेगवेगळ्या गावातील नऊ शेतकऱ्यांना रविवारी विषारी सापाने दंश केल्याच्या घटना घडल्या. सर्पदंश झालेल्या त्या शेतकऱ्यांना अत्यावस्थेत मुखेड येथील डॉ. दिलीप पुंडे यांच्या दवाखान्यात आणण्यात आले. सर्व रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने सर्वांना कृत्रिम श्वासावर ठेवण्यात आले. यात बब्रूवान बोडके (40), जिजाबाई वडजे (42), रब्बानी मौला, लक्ष्मण घाडगे (45), अशोक घारगे (30), निर्मलाबाई मोहन पल्ले, बाबुराव दडले, या सात जणांना विषारी घोणस जातीच्या सापाने दंश केला. तर सखाराम घाटकर (65), यांना कोब्रा जातीच्या विषारी सापाने चावा घेतला, सुमनबाई गोजे यांना विषारी मन्यार जातीच्या सापाने चावा घेतला.

यावेळी दिलीप पुंडे म्हणाले की, हे सर्व सर्पदंश झालेले रुग्ण रविवारी सायंकाळी सातच्यानंतर आले या सर्वांची तब्येत नाजूक होती. या रुग्णांना उपचार मिळाल्याने हे सर्व रुग्ण मृत्यूच्या दाढेतून बाहेर आल्याचे डॉ.पुंडे यांनी सांगितले. या सर्वांवर अद्यापही उपचार चालू आहेत. डॉ. पुंडे यांनी देवदूत बनून आम्हाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढल्याचे सांगून पुंडे यांच्याबद्दल रुग्णांनी कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान शेतकऱ्यांनी शेतात जाताना पायात बूट घालून पुरेशी काळजी घावी, पिकात जाऊ नये, असे आवाहनही डॉक्टरांनी केले आहे.