
कोरोनाची दुसरी लाट रोखण्यात पेंद्र सरकारला पूर्णपणे अपयश आल्यामुळे देशभरात हाहाकार उडाला हे स्पष्ट झाले आहे. विशेषतः उत्तर प्रदेशात पवित्र गंगा नदीच्या प्रवाहात शेकडो मृतदेह वाहून आले. यामुळे देशातच नव्हे तर जगभरात टीकेची झोड उठली. या महामारीशी अवघा देश लढत असताना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मात्र पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची चिंता लागली आहे. भाजप इलेक्शन मोडमध्ये आहे. त्यासाठी संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर ‘चिंतन’ बैठक केली आहे.
कोरोना उद्रेकामुळे मोदी सरकारविरोधात देशभरात जनक्षोभ निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सूचनेनुसार रविवारी रात्री उशीरा दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबले, उत्तर प्रदेशचे संघटनप्रमुख सुनील बन्सल यांच्यात ही बैठक झाली. यावेळी संघनेत्यांनी भाजप नेतृत्वाला कानपिचक्या दिल्याचे समजते.
भाजपची प्रतिमा मलिन झाली
या बैठकीत कोरोना स्थिती हाताळण्यात मोदी सरकारला आलेले अपयश, जनतेमध्ये प्रचंड नाराजी, भाजप गमावत असलेली व्होट बँक यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. देशात ऑक्सिजन बेडची कमतरता असताना केंद्र सरकारने काहीही केलेले नाही. लसीकरण सुरू केले मात्र, जनतेला लसच मिळत नाही. या स्थितीत सरकार ठोस काही करताना दिसत नाही. उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारच्या कारभाराचे तर पूर्णपणे धिंदवडे निघाले आहेत. यावर बैठकीत संघनेत्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. गंगेत मृतदेह वाहत आहेत. उत्तर प्रदेशसह इतर भाजपशासित राज्यांनाही कोरोनाचा कहर रोखता आला नाही. या वस्तुस्थितीवर बैठकीत ‘चिंतन’ करण्यात आले.
बृजेश पाठकांना धमकी; योगींची उचलबांगडी होणार ?
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या दडपशाहीचे नवे उदाहरण यूपी सरकारमधील मंत्री बृजेश पाठक यांच्या रूपाने पुढे आले आहे. कोरोनाच्या स्थितीवरून योगी आदित्यनाथ यांच्यावर उघड टीका करण्याचे धाडस पाठक यांनी दाखविले. मात्र, योगी आदित्यनाथ यांनी पाठक यांना प्रत्यक्ष बोलावून धमकावल्याची चर्चा आहे. पाठक यांनी तशी तक्रार केंद्रीय नेत्यांकडे तसेच संघाच्या पदाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यामुळे योगींच्या अरेरावीला आता संघाचे आणि केंद्रातले नेतेही कंटाळले असून, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसू नये, यासाठी योगी आदित्यनाथ यांची उचलबांगडी करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. अशा स्थितीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग किंवा विद्यमान उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्या यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची चर्चा सुरू आहे.
योगी आदित्यनाथ रडारवर;…तरच ‘मिशन 2024’ सोपे
या बैठकीत संघाच्या नेत्यांचा सर्वाधिक रोष उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्यावर होता. कोरोनाची स्थिती तर योगींनी नीटपणे हाताळली नाहीच, शिवाय ऑक्सिजन व बेड मागणाऱ्यांवर थेट पोलीस कारवाई करण्याची दडपशाही केली. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात युपीमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यांच्या दडपशाहीला घाबरून मृत्यूची उत्तर प्रदेशात सरकार दफ्तरी नोंद न करता अनेकांनी मृतदेह अक्षरशा गंगा नदीत लोटले. त्यामुळे गंगेच्या किनाऱ्यांवर हजारोंच्या संख्येने प्रेते तरंगताना दिसत आहेत. पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघात तर जनता कोरोनाने बेहाल आहेत. योगी आदित्यनाथ कोणालाही जुमानत नाहीत, मनमानी कारभार करतात, योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवले नाही, तर पुढीलवर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला 50 पेक्षाही कमी जागा मिळतील़ भाजपचे मिशन 2024 सोपे असणार नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशातून दोन अंकीही जागा मिळणार नाहीत, अशी भीती सुनील बन्सल यांनी या बैठकीत बोलून दाखविल्याचे समजते. गेल्या विधानसभा निवडणुकीत सुनील बन्सल यांनीच भाजपाची संघटनात्मक जबाबदारी पार पाडून पक्षाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.



























































