विवेक जागर प्रबोधन अभियान, डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यासाठी हौतात्म्य प्राप्त झालेले शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त येत्या 20 ऑगस्टपासून समितीच्या वतीने राज्यभर ‘विवेक जागर प्रबोधन अभियान’ राबविण्यात येणार आहे. तसेच हिंदुस्थानी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षप्रारंभानिमित्ताने वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी स्वातंत्र्याचा उद्घोष करण्यात येणार असल्याचे महाअंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त राज्यभर अभिवादन करण्यात येणार आहे. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासातील अक्षम्य दिरंगाई व तसेच खऱया गुन्हेगारांचा छडा लावण्यात येत असलेल्या अपयशाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवेदन देण्यात येणार असल्याचेही अविनाश पाटील यांनी सांगितले. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला येत्या 20 ऑगस्ट रोजी आठ वर्षे म्हणजे 96 महिने म्हणून 2920 दिवस पूर्ण होत असल्याने तेवढी निवेदने मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहेत. समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर पाठीराखे, हितचिंतक या दिवशी राज्यभरातील 350 पेक्षा जास्त अंनिसच्या शाखांमधून सकाळी 7 ते 9 या एकाच वेळी आयोजित करण्यात येणाऱया ‘मॉर्निंग वॉक’मध्ये सहभागी होणार आहेत. कोरोना काळाचे नियम पाळून मुंबईत आठ ठिकाणी निदर्शने करण्यात येणार आहेत तसेच 20 ऑगस्ट हा राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून साजरा करण्यात येणार असून महिनाभर चर्चासत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. 15 ऑगस्टपासून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी स्वातंत्र्याचा उद्घोष करण्याचा प्रयत्न होणार आहे. 21 ऑगस्ट ते 21 सप्टेंबरदरम्यान 36 जिह्यांमधून किमान 75 प्रबोधनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.