
सामना ऑनलाईन | कोलकाता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिलीगुडी येथून प. बंगालमधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. या सभेत त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले. प. बंगालच्या विकासाच्या मार्गातील ममता बॅनर्जी या स्पीड ब्रेकर आहेत, असा टोला मोदी यांनी लगावला.
ममता यांनी केंद्र सरकारच्या ज्या योजना थांबवल्या आहेत त्यांची यादी मोठी आहे. त्यांनी आयुष्यमान योजना रोखली ज्यामध्ये गरीबांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जातात. याशिवाय त्यांनी 70 लाख शेतकर्यांना फायदा पोहोचवणारी योजनाही थांबवली. तसेच बिल्डर्सना ग्राहकांची लूट करण्यापासून रोखणाऱया रेराची अंमलबजावणी करण्यासही त्यांनी नकार दिला, असे मोदींनी सांगितले आहे.
इतर राज्यांप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये गतीने विकास होऊ शकला नाही हे खरं आहे. याचं कारण पश्चिम बंगालमध्ये स्पीड ब्रेकर आहे ज्याला दीदी म्हणून ओळखलं जातं. त्यांना गरिबी हटवायची नाही. जर गरिबी संपली तर त्यांचं राजकारणही संपेल. त्यांना गरिबी पाहायची आहे आणि त्यामुळे त्यांनी गरीबांसाठी सुरू असणारे विकास प्रकल्प थांबवले आहेत्, अशी टीकाही मोदी यांनी केली.
























































