
केंद्रीय तपास यंत्रणा ‘ईडी’चा गैरवापर करून राजकीय विरोधकांवर सूडबुद्धीने कारवाई करणाऱया मोदी सरकारला आज झटका बसला. आम आदमी पक्षाचे नेते, खासदार संजय सिंह यांनी ‘ईडी’लाच मानहानीची नोटीस पाठवत जोरदार ‘तडी’ दिली. 48 तासांच्या आत माफी मागा नाहीतर कायदेशीर कारवाई करू, असा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे पुलवामा हल्ल्याबाबत मोदी सरकारचा पर्दाफाश करणारे जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक स्वतःहू समर्थकांसह पोलीस ठाण्यात धडकले.
48 तासांत माफी मागा, नाहीतर कोर्टात खेचतो! संजय सिंह यांचा थेट इशारा
दिल्लीमधील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणाच्या आरोपपत्रात आपल्या नावाचा नाहक समावेश केल्याचे सांगत ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी आज थेट ‘ईडी’लाच मानहानीची नोटीस बजावली व माफी न मागितल्यास कोर्टात खेचण्याचा इशारा दिला आहे.
ईडीचे संचालक संजयकुमार मिश्रा आणि संबंधित कथित घोटाळ्याची चौकशी करणारे तपास अधिकारी जोगेंदर यांना ही नोटीस पाठवली असून 48 तासांत माफी मागा, अन्यथा कोर्टात खेचतो असा इशाराही दिला आहे. आपल्याविरोधात कोणतेही साक्षीदार, पुरावे नसताना कथीत उत्पादन शुल्क प्रकरणात आपले नाव गोवण्यात आल्याचा आरोप संजय सिंह यांनी केला आहे. यामुळे ईडीच्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी मानहानीचा खटला दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपली बदनामी करण्यासाठीच हे षडयंत्र असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.





























































