एक तरी वारी अनुभवावी; मोदींची ‘मन की बात’

26

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आषाढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वरांच्या ‘एक तरी ओवी अनुभवावी,’ याचा दाखला देत देशवासियांना ‘एकदा तरी पंढरपूरच्या वारीचा अनुभव घ्या,’ असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४६ व्या ‘मन की बात’मधून केले आहे. पावसाळ्यात होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून स्वत:चं संरक्षण करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. अतिवृष्टीसह देशातील विविध समस्यांवर भाष्य करतानाच पंतप्रधान मोदी यांनी पंढरपूरच्या वारीचं महत्त्वही अधोरेखित केलं.

‘महाराष्ट्रातील पंढरपूरमध्ये आषाढात वारी निघते. या वारीत लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी होतात. शिक्षण, संस्कार आणि श्रद्धेचा त्रिवेणी संगम म्हणजे ही वारी असते. पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात जाणं याच्यासारखा दुसरा अध्यात्मिक आनंद नाही. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने वारीचा हा अनुभव घ्यायलाच हवा,’ असं भावनिक आवाहन मोदी यांनी केलं. मोदी यांनी लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना आदराजंली वाहिली. प्रसिद्ध कवी नीरज यांनाही श्रद्धांजली वाहिली. ‘आशा, विश्वास, दृढसंकल्प यांचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे कवी नीरज होते,’ अशा शब्दांत त्यांनी नीरज यांना श्रद्धांजली अर्पण केली.

निसर्गाशी संघर्ष टाळणे मानवजातीच्या कल्याणासाठी नेहमीच उपकारक ठरणार आहे ,असे मत व्यक्त करीत मोदी यांनी गणेश मूर्तीपासून ते सजावटीपर्यंत सर्वत्र इको फ्रेंडली वस्तू वापरा.अशा पर्यावरणपूरक उत्सव सोहळ्याच्या स्पर्धाही प्रत्येक शहरात आयोजित केल्या जाव्यात असे आवाहन केले. इको फ्रेंडली गणेशोत्सवांना माय गव्हर्नमेंट आणि नरेंद्र मोदी ऍपवरून प्रसिद्धी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

आपली प्रतिक्रिया द्या