‘बेल’वर फिरणाऱ्यांना ‘जेल’मध्ये धाडणार, राहुल गांधींवर मोदी बरसले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधीपक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. जे जेलमध्ये आहेत, जे बेलवर (जामीन) आहेत त्यांना केंद्रात मजबूत सरकार असल्याचे पाहावले जात नाही. जसे आम्ही मिशेल ‘मामां’ना उचलून आणले आहे, तसेच अन्य ‘काकां’ना देखील यावे लागेल. आतापर्यंत यांना फक्त बेलपर्यंत आणलं आहे. आता मात्र जेलमध्ये टाकण्याची पूर्ण तयारी आहे, असा इशारा त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव न घेता दिला आहे.

ज्यांच्या नशिबात विरोधीपक्षाचे नेते पद देखील आले नाही, ते पंतप्रधान बननण्याच स्वप्न बघत आहे, असा सणसणीत टोला देखील त्यांनी यावेळी लगावला आहे. विरोधीपक्ष यंदा केंद्रात सरकार नाही तर संसदेत आपले खासदारांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण यांची ताकद वाढल्यास बिहारमध्ये पुन्हा लुट-हाणामारी अशा घटनांमध्ये वाढ होईल. दिल्लीत दुबळं सरकार यावं म्हणजे यांना लूटमार करण्यास अडथळे येणार नाहीत, असा यांचा विचार असल्याचेही मोदी यावेळी बोलताना म्हणाले.

लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. बिहारच्या मुजफ्फरपूर येथे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका विराट सभेला संबोधित केले. यासभेत बोलताना त्यांनी राहुल गांधींवर अप्रत्यक्ष हल्ला चढवला.