
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात आज सायंकाळी 7 वाजता नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील आणि ‘मोदी 2.0’ पर्वाला प्रारंभ होईल. दणदणीत बहुमताचा कौल मिळवून सत्तेवर आलेल्या या ‘एनडीए’ सरकारमध्ये कोणाची वर्णी लागणार? याची जनतेमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. राजधानी दिल्लीत बुधवारी खल, चर्चा आणि गाठीभेटीचे सत्र सुरू होते.
राष्ट्रपतीभवनाच्या प्रांगणात होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला आठ हजार मान्यवर पाहुणे उपस्थित राहणार आहेत. आजवरचा हा सर्वात मोठा आणि भव्य शपथविधी सोहळा असणार आहे. 2014 ला 5000 पाहुणे उपस्थित होते. सायंकाळी 7 ते रात्री 8.30 असा 90 मिनिटे शपथविधी सोहळा चालणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. त्यानंतर कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.
पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यात 5 तास चर्चा
मंत्रिमंडळाची रचना ठरविण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यात पाच तास बैठक झाली. मात्र, या बैठकीनंतरही नावे गुलदस्त्यात राहिली. दरम्यान, जदयुचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा केली.
सोनिया, राहुल उपस्थित राहणार
शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीए चेअरमन सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांच्यासह विविध पक्षांचे नेते, अनेक मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
देश-विदेशातील मान्यवर
- या शपथविधी सोहळ्याला देश-विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ‘बिमस्टेक’मधील सात सदस्य राष्ट्रांचे प्रमुख हजर राहतील. यामध्ये बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, नेपाळ, भूतान, मॉरिशस, थायलंडचा समावेश आहे. 2014 ला ‘सार्क’ देशांचे प्रमुख हजर होते.
- कला, क्रीडा, साहित्य, चित्रपट, संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांनाही निमंत्रण पाठविण्यात आले आहे.
कोणाचा समावेश असेल?
- ‘मोदी 2.0’मध्ये कोणाचा समावेश असेल? कोणत्या राज्यातून किती मंत्री असतील? खातेवाटप कसे असेल? यावरून बुधवारी राजधानी दिल्लीत चर्चेला उधाण आले. राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत.
- भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्याच बरोबर नितीन गडकरी, राजनाथ सिंह, पीयूष गोयल, निर्मला सीतारामन आणि स्मृती इराणी या मंत्र्यांची नावे पक्की असल्याचे समजते.
मला मुक्त करा! जेटली भावुक
गेली पाच वर्षे सरकारच्या प्रत्येक धोरणात्मक निर्णयाचे ठामपणे समर्थन करणारे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ‘मोदी 2.0’ सरकारमध्ये सहभागी होण्यास असमर्थता दर्शविली आहे. जेटली यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे. ‘नव्या मंत्रिमंडळात मला कोणतीही जबाबदारी देऊ नये, मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा’ असे जेटली यांनी या पत्रात म्हटले आहे. जेटली यावेळी भावुक झाले आहेत. सध्या प्रकृतीच्या तक्रारींमुळे उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत मला स्वतःसाठी पुरेसा वेळ हवा आहे. त्यामुळे नव्या सरकारमध्ये मला कोणतेही पद देऊ नये असे जेटली यांनी म्हटले आहे. ‘आपल्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली हा माझा सन्मान समजतो. सत्ता नसताना पक्षामध्ये संघटनात्मक पातळीवर मोठय़ा जबाबदाऱ्या मला मिळाल्या. असे सांगून जेटली यांनी मोदींचे आभार मानले आहेत. दरम्यान, या पत्रानंतर पंतप्रधान मोदी यांनी अरुण जेटली यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
























































