
सामना प्रतिनीधी । खालापूर
विकास आराखडय़ात नमूद असलेला १२ मीटरचा रस्ता नगरपालिकेनेच ‘गिळल्या’चा प्रकार खोपोलीत समोर आला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत एक-दोन नव्हे तर पाच ते सहा इमारतींना चुकीच्या पद्धतीने ओसी देण्यात आले असून प्रशासनाच्या या आडमुठेपणामुळे शहरातील रस्ता रुंदीकरणाचे ५० कोटींचे प्रस्ताव लटकले आहेत. त्यामुळे एकीकडे पालिका अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली दुकानदारांवर कारवाई करत असताना बांधकाम व्यावसायिकांना मात्र इमारत परवाना देताना सर्व नियम धाब्यावर बसवत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
वाढत्या अतिक्रमणांमुळे खोपोलीतील अनेक मोठय़ा रस्त्यांचा अक्षरशः चुथडा झाला आहे. मात्र राजकीय दबावाखाली असलेल्या प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने मुख्य बाजारपेठेतील १२ मीटरचा रस्ता सध्या सात मीटरही शिल्लक राहिलेला नाही. खोपोली-शीळफाटा मार्ग कागदोपत्री नऊ मीटर असताना येथून एक गाडी जातानाही मारामार आहे. तीच अवस्था अभाणी मार्गाची आहे. याविरोधात खोपोलीकरांनी आवाज उठवल्यानंतर मुख्याधिकाऱयांनी अतिक्रमणविरोधी पथक घेऊन रस्ता रुंदीकरणाचा आढावा घेतला. इतकेच नाही तर अतिक्रमणधारकांना बांधकामे तोडण्याची डेडलाइन दिली. मात्र ही कारवाई सुरू असतानाच खोपोली मुख्य बाजारपेठेत १२ मीटरच्या रस्त्यावर पाच ते सहा बिल्डरांना चुकीच्या पद्धतीने परवानग्या दिल्याने या इमारतींनी अक्षरशः रस्तेच गिळंकृत केले आहेत. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचे ५० कोटींचे प्रस्ताव लटकले असून अतिक्रमण हटाव मोहिमेचा विचकाच झाला आहे.

































































