दादासाहेब फाळके स्मारक पर्यटकांसाठी खुले, 30 जूनपर्यंत मोफत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन वर्षांपासून बंद असलेले चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारक गुरुवारी, 16 जूनपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. येथे पंधरा दिवस मोफत प्रवेश दिला जाणार असून, एक जुलैपासून तिकीट आकारण्यात येणार आहे. आकर्षक उद्यान, संगीत कारंजा आणि धबधब्यांमुळे येथील निसर्गरम्य वातावरणाचे सौंदर्य आणखीच खुलले असून, या रम्य परिसराला भेट देणे नाशिककरांसाठी आनंददायी पर्वणी ठरणार आहे. महापालिका प्रशासक आयुक्त रमेश पवार यांनी आज येथे पहाणी करीत अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत.

पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेले दादासाहेब फाळके स्मारक दोन वर्षांपासून बंद होते, त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी महापालिका आयुक्त प्रशासक रमेश पवार यांच्यासमवेत 15 एप्रिल 2022 रोजी या स्मारकाची पहाणी केली. फिल्मसिटीच्या धर्तीवर पुनर्विकास करून या स्मारकाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करा, अशा सूचना खासदार संजय राऊत यांनी दिल्या होत्या.

आयुक्त रमेश पवार यांनी स्वत: लक्ष घालून स्मारकाच्या कामाला गती दिली. दोनच महिन्यात म्हणजे 16 जून रोजी पर्यटकांसाठी ते खुले केले. येथे उद्यान, दोन धबधबे, संगीत कारंजा सुरू करण्यात आला आहे. लवकरच फूड कोर्टही सुरू करण्यात येणार आहे. आयुक्तांनी आज गुरुवारी सकाळी 9 वाजता पहाणी करून अधिकार्‍यांना सूचना दिल्या. पर्यटकांना 30 जूनपर्यंत मोफत प्रवेश दिला जाणार असून, 1 जुलैपासून प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. यापुढेही बारा वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी प्रवेश मोफत राहील, तर 12 ते 18 वयोगटासाठी 5 रुपये, 18 वर्षापुढील वयोगटासाठी 10 रुपये तिकीट असणार आहे, अशी माहिती स्मारकाचे व्यवस्थापक जे. के. कहाणे यांनी दिली. पहाणी प्रसंगी उपायुक्त मनोज घोडे-पाटील, शहर अभियंता नितीन वंजारी, अधिक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, डॉ. आवेश पलोड, उपअभियंता हेमंत पठे, प्रकाश मोरे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

फिल्मसिटीच्या धर्तीवर पुनर्विकास- आयुक्त   

या स्मारकाचा रामोजी राव फिल्मसिटीच्या धर्तीवर पुनर्विकास करण्यात येणार असून, त्यासाठी सल्लागार नेमण्याची कार्यवाही सुरू असल्याचे महापालिका प्रशासक आयुक्त रमेश पवार यांनी स्पष्ट केले.