नाशिकमधून बेपत्ता झालेल्या इंजिनियर तरुणाचा मृतदेह आढळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यतील भोकरदन तालुक्यातील कोठी तांदुळवाडी येथील बेपत्ता तरुण अभियंत्याचा मृतदेह आढळला आहे. अभिषेक कैलास खरात (22) असे त्या तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे अभिषेकला फेब्रुवारी महिन्यात कॅम्पस भरतीत नोकरी लागली होती. दरम्यान नोकरीवर रुजू होऊन तो चुलत बहिणीच्या लग्नासाठी गावी येणार होता. परंतु त्यापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने तांदुळवाडी गावात शोककळा पसरली आहे.

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कोठी तांदुळवाडी येथील कैलास खरात यांचा एकुलता एक मुलगा अभिषेक याने नाशिक येथील के. के. वाघ इंजिनिअरिंग महाविद्यालयात शिक्षण पुर्ण केले होते. त्याला कॅम्पस मुलाखतीच्या माध्यमातून नोकरी मिळाली होती. मुलाला चांगली नोकरी लागल्याने त्याच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. दरम्यान 26 फेब्रुवारी रोजी रात्री 10 च्या सुमारास एका हॉटेलमध्ये तो जेवायला गेला होता. तेथून तो वसतिगृहावर परतला नाही. यामुळे त्याच्या मित्रांनी अभिषेकच्या घरी कळवले . त्यानंतर त्याचे नातेवाईक नाशिक येथे दाखल झाले व त्यांनी सर्वत्र शोध घेतला मात्र अभिषेक सापडला नाही.

अभिषेकच्या वसतिगृहाच्या बाजूला असलेल्या गंगापूर धरणाच्या कॅनॉल मध्ये त्याचा शोध घेण्यात आला असता त्याचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे तांदुळवाडी गावात शोककळा पसरली आहे.