गंगापूर धरणातून 1560 क्युसेक्स विसर्ग, गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शनिवारपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने नाशिकच्या गंगापूर धरणातून 1 हजार 560, तर होळकर पुलाखालून 2 हजार 881 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ होवून दुतोंड्यामारुतीच्या पायापर्यंत पूरपाणी पोहचले आहे. जिल्ह्यात गंगापूर, दारणासह 11 धरणांतून पाणी सोडलेले असल्याने नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत.

जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल शनिवारपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरूच आहे. रविवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला होता. दुपारनंतर जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला. गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकूण 257 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यात सर्वाधिक पाऊस इगतपुरीत 58 मि.मी. इतका पडला. पेठ – 50, सुरगाणा – 33, त्र्यंबकेश्वर – 19, कळवण – 16, नाशिक, देवळा, सटाणा- 13, नांदगाव – 11, दिंडोरी- 10, निफाड – 9, सिन्नर, चांदवड, मालेगाव – 4 मिलिमीटर अशी आकडेवारी होती. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 85 टक्के पाऊस झाला आहे.

नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 94 टक्के भरलेले आहे. त्यातून आठवडाभरापासून विसर्ग सुरू आहे. मागील रविवारी या धरणातून प्रथमच 1 हजार 40 क्यूसेक्स पाणी सोडले होते. पाणलोट क्षेत्रातील संततधारेमुळे शनिवारी रात्रीपासून विसर्ग 1 हजार 560 क्यूसेक्सपर्यंत वाढविण्यात आला. या धरण समुहात 82 टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक साठवण क्षमता असलेले गिरणा धरण 74 टक्के भरले आहे. दुसऱया क्रमांकाचे मुकणे धरणात 77, तर दारणामध्ये 94 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. रविवारी दारणातून 4 हजार 354, भाम 1 हजार 310, कडवा – 848, वालदेवी – 813, भावली – 481, पालखेड – 437, नांदूरमध्यमेश्वर – 9684, चणकापूर – 1168, हरणबारी – 251, केळझर – 198, तर माणिकपुंजमधून 310 क्यूसेक्स पाणी सोडलेले आहे.

एकूण जलसाठा 79 टक्के

जिल्ह्यातील 24 धरणांमध्ये 7 मोठे, तर 17 मध्यम प्रकल्प आहेत. त्यांची एकूण साठवण क्षमता 65 हजार 818 दशलक्ष घनफूट आहे. आजचा एकूण साठा 51 हजार 949(79 टक्के) झाला आहे. मागील वर्षी हा साठा आजच्या तारखेला 59 हजार 388 (90 टक्के) होता.

बार्शी पाझर तलाव ओव्हरफ्लो

देवळा तालुक्यातील वार्शी येथील पाझर तलाव ओव्हरफ्लो झाल्याने खर्डे,वार्शी व मुलुखवाडी परिसरातीलग्रामस्थांची पाणीटंचाईची समस्या सुटली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडयापर्यंत समाधानकारक पाऊस नसल्यामुळे खर्डे परिसरातील नदी,नाले कोरडेठाक पडले होते. मात्र,गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने कोलथी नदीचे पाणी वार्शी पाझर तलावात पोहोचले आहे. त्यामुळे शनिवारी रात्री हा तलाव पूर्ण भरला. यामुळे सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यानेग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. येथे योद्धा मित्र मंडळाने जलपूजन केले.