शिक्षणाचा ध्यास, राष्ट्रीय धावपटू तिसाव्या वर्षी दहावी उत्तीर्ण

472

घरातील हालाखीच्या परिस्थितीमुळे सातवीतच शिक्षण सोडून नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील नीलेश बोराडेने खाणकाम करायला सुरुवात केली. मात्र या तरुणाने स्वत:च्या जिद्दीवर धावपटू होत राष्ट्रीय स्तरापर्यंत बाजी मारली. मात्र कुठेतरी शिक्षण अपूर्ण राहिल्याची खंत त्याच्या मनात होती. वयाच्या तेराव्या वर्षी सोडलेले शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा सोळा वर्षानंतरही संपली नव्हती. त्यामुळे या धावपटूने यंदा वयाच्या तिसाव्या वर्षी दहावीची परीक्षा देवून 65 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाला. देशसेवेसाठी लष्करात जाण्याचे त्याचे स्वप्न असून त्या दिशेने हे एक पाऊल टाकले आहे.

प्रचंड इच्छाशक्तीला परिश्रमाची जोड दिल्यास सर्व काही शक्य असते, हे इगतपुरी तालुक्यातील घोटीतील नीलेश भास्कर बोराडे याने दाखवून दिले आहे. गरीबीमुळे त्याचे सातवीतच शिक्षण सुटले, पुढे खाणकाम करीतच त्याने स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय स्तरापर्यंत अनेक मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेऊन नावलौकिक मिळवला. विविध स्पर्धांच्या माध्यमातून आतापर्यंत त्याने बारा हजार पाचशे किलोमीटर धावण्याचा विक्रम केला आहे. तसेच अनेक सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. मात्र शिक्षणाअभावी सैन्यात जाण्यापासून वंचित रहावे लागले ही खंत त्याला होती. म्हणून त्याने तब्बल सोळा वर्षांनंतर मोठ्या जिद्दीने यंदा दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेत अभ्यास केला. बुधवारी दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला, नीलेशने 65 टक्के गुणांसह यश मिळवले आहे. यामुळे त्याचे कुटूंबीयदेखील आनंदी झाले आहे. त्याचे यश सर्वांना प्रेरणा देणारे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या