नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस; गोदावरी, दारणासह अनेक नद्यांना पूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक जिल्ह्यात 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने सर्व नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी येथे प्रचंड पावसाने काही रस्ते आणि पूल पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले. नाशिक व परिसरातील दमदार पावसाने तसेच गंगापूर धरणातून पाणी सोडल्याने गोदावरीला पूर आला आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, नदीकाठी पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी या आदिवासीबहुल भागाला आज सलग सहाव्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपले. तालुक्यातील काही भागांमध्ये सोमवारीही दमदार पर्जन्यवृष्टी सुरू होती. जिल्ह्यात इतरत्र मध्यम ते जोरदार सरी बरसल्या, त्यामुळे धरणसाठय़ांमध्ये समाधानकारक वाढ झाल्याचे चित्र आहे.

नाशिक शहरातही रविवारपासून विश्रांती न घेता दमदार पाऊस सुरू आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. गोविंदनगर येथील मुख्य रस्ता आर. डी. सर्कलजवळ खचला. इमारत बांधकामाचा पाया खोदताना भराव न टाकल्याने हे घडले असून, येथे एकेरी वाहतूक सुरू होती.

गंगापूर धरणातून दुपारी 2 वाजता 10 हजार 35 क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले, तर होळकर पूलाखालून 13 हजार 45 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरीला पूर आला आहे. नदीपात्रातील मंदिरे पाण्याखाली गेली असून, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पूराचे पाणी पोहोचले होते.

गोदावरीप्रमाणेच जिल्ह्यातील दारणा, गिरणा, कडवासह बहुतांश नद्या-नाल्यांना पूर आला आहे. सध्या दारणा धरणातून 15 हजार 572, कडवा- 6 हजार 712, पालखेड- 21 हजार 560, चणकापूर- 23 हजार 665, पुनद- 8 हजार 829, ठेंगोडा- 26 हजार 900, तर नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यातून 49 हजार 480 क्यूसेक्स पाणी सोडले आहे.

एकजण वाहून गेला

पेठ तालुक्यातील पळशी खुर्द येथे कडक नदीला आलेल्या पूराच्या पाण्यात पुंडलिक लक्ष्मण महाकाळ (68) हे आज सकाळी वाहून गेले. सुरगाणा तालुक्यातील करंजूल येथे दुपारी गोठ्याची भिंत कोसळली, त्यावेळी पूरात वाहून गेल्याने दोन बैलांचा मृत्यू झाला.

काही रस्ते बंद, पूलही पाण्याखाली

सुरगाणा तालुक्यात सर्व नद्यांना पूर आला आहे. उंबरठाण बाजूचे पाच ते सहा रस्ते, तसेच नार नदीवरील उंबरदे येथे राज्यमार्गही पाण्याखाली गेला. तालुकास्तरीय यंत्रणा युद्धपातळीवर काम करीत असून, परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती तहसीलदार राजेंद्र मोरे यांनी दिली. त्र्यंबकेश्वर तालुक्यात शिरसगाव-मुरंबी येथे पुलाचे काम सुरू असून, तेथील बांधकाम साहित्य वाहून गेले. निफाड तालुक्यातील रवळस पिंपरी पूलही पाण्याखाली असल्याने गावांचा संपर्क तुटला होता. पेठ तालुक्यातील कापुर्णे घाटात फरशी पूल तुटला. खामशेत, सावळघाट ते इनामबारी पूलावरून पाणी वाहत होते.

घाटातील रस्ते खचले

पेठ तालुक्यातील बिलकस ते उंबरपाडा घाट व भुवन घाट तीन ठिकाणी खचला. अंधृटे-आडगाव रस्त्याचा भराव वाहून गेला. मात्र, तेथील वाहतूक सुरू होती. कुंभाळे, डेरापाडा, कळमबारी, घनशेत, नालशेत, कोहोर येथे 8 ते 10 कच्च्या घरांची पडझड झाली आहे, अशी माहिती तहसीलदार संदीप भोसले यांनी दिली.

आयुक्तांकडून पाहणी; नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले

गोदावरीला पूर आल्याने नदीपात्र व परिसरातील पूरस्थितीची सोमवारी महापालिका प्रशासक आयुक्त रमेश पवार यांनी पाहणी केली. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, पूरपरिस्थितीचा धोका असलेल्या नागरिकांना सुखरूपस्थळी हलविण्याचे आदेश यंत्रणेला दिले. त्यानुसार दुपारी संत गाडगे महाराज ट्रस्ट येथील 65 दिव्यांगांना अग्निशमन दलाने सुरक्षितस्थळी हलवले. चौक मंडईत एका वाड्याची भिंत कोसळली, तेथील सर्व रहिवासी सुखरूप आहेत.

तीन दिवस रेड अलर्ट

जिल्ह्यातील घाट परिसरात 12 ते 14 जुलै असे पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

सुरगाण्यात 239.8 मिमी पाऊस

जिल्ह्यात 24 तासात सर्वाधिक पाऊस सुरगाणा येथे 239.8 मिलिमीटर झाला. पेठ- 187.6, त्र्यंबकेश्वर- 168, दिंडोरी- 99.3, इगतपुरी- 99.2, कळवण- 94.1, नाशिक- 59.8, चांदवड- 54.2, निफाड- 45.3, सटाणा- 35.7, देवळा- 29, मालेगाव- 24, येवला- 30, नांदगाव- 16, सिन्नर- 10 अशी तालुकानिहाय आकडेवारी आहे.

गंगापूर धरणात 67 टक्के साठा

पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने गंगापूर धरण दुपारपर्यंत 3 हजार 752 दशलक्ष घनफूट (67 टक्के) भरले, तर दारणातील जलसाठा 4 हजार 922 दशलक्ष घनफूट (69 टक्के) झाला आहे.

सप्तशृंग गडावर सात भाविक जखमी

सप्तशृंग गड येथे आज मुसळधार पाऊस झाल्याने मंदिराजवळील उतरणीच्या पायरी मार्गावर प्रचंड पाणी वाहत होते. येथील पाण्याच्या टाकीजवळची भिंतही खचल्याने दगडमाती वाहून आली. यामुळे पायर्‍या उतरणारे सात भाविक किरकोळ जखमी झाले. त्यांना धर्मार्थ आणि ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. येथील प्रदक्षिणा मार्ग देखील खचला आहे.