
एमएलबी खेळ परिसर, राइट टाऊन, जबलपूर, मध्य प्रदेश येथे आयोजिलेल्या 54 व्या राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, कोल्हापूर, रेल्वे, विमान प्राधिकरण बाद फेरीत फेरीत पोहचले आहेत. मंगळवारी झालेल्या पावसामुळे सर्व सामने बंदिस्त असलेल्या एकाच मॅटवरील क्रीडांगणावर सामने सुरू आहेत. पावसामुळे साखळी सामान्यांनंतर होणारे उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने रद्द करून प्रत्येक गटातील विजेता संघ थेट उपउपांत्य फेरीत खेळेल. त्यामुळे पुरुषांमध्ये महाराष्ट्र वि. पश्चिम बंगाल, रेल्वे वि. विदर्भ, कर्नाटक वि. केरळ व कोल्हापूर वि. दिल्ली तर महिलांमध्ये महाराष्ट्र वि. पंजाब, विमान प्राधिकरण वि. दिल्ली, हरयाणा वि. कोल्हापूर, व कर्नाटक वि. ओडिशा असे सामने उपउपांत्य फेरीत रंगतील.
पुरुषांच्या सामन्यात महाराष्ट्राने तेलंगणाचा 15-6 असा 9 गुणांनी धुव्वा उडवत उपउपांत्य फेरीतले स्थान पक्के केले. महाराष्ट्राच्या गजानन शेंगाळ (2ः00, 2ः30 मि. संरक्षण), मिलिंद कुरपे (5 गडी), अक्षय भांगरे (2ः20, 2ः00 मि. संरक्षण) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलत महाराष्ट्राला सहज विजय मिळवून दिला, तर तेलंगणाच्या जीविथ रावने (2ः00 मि. संरक्षण व 1 गडी) एकहाती लढत देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला इतर सहकाऱयांची साथ न मिळाल्याने मोठा पराभव पत्करावा लागला.
पुरुषांच्या सामन्यात रेल्वेने छत्तीसगडचा 13-09 असा एक डाव 4 गुणांनी धुव्वा उडवला. रेल्वेच्या अक्षय गणपुले, अमित पाटील, शिजेश यांनी विजयात मोलाची कामगिरी करत आरामात विजय मिळवून दिला तर छत्तीसगडच्या गजेंद्रने चांगला खेळ केला.
महिलांच्या सामन्यात महाराष्ट्राने विदर्भाचा 10-4 असा एक डाव 6 गुणांनी पराभव करत गटविजेते होत थेट उपउपांत्य फेरीत स्थान मिळवले. महाराष्ट्राच्या रूपाली बडे (2ः50 मि. संरक्षण), अपेक्षा सुतार (3ः00 मि. संरक्षण व 1 बळी), आरती कांबळे (3ः20 मि. संरक्षण), स्नेहल जाधव (2ः00 मि. संरक्षण व 2 बळी) प्रियांका इंगळे (नाबाद 1ः40 मि. संरक्षण व 2 बळी) यांनी केलेल्या उत्कृष्ट खेळीने मोठा विजय साजरा करता आला. तर पराभूत विदर्भाच्या ऐश्वर्या धोकेने (1ः40 मि. संरक्षण) एकाकी लढत दिली.
महिलांच्या दुसऱया एका सामन्यात कोल्हापूरने पश्चिम बंगालवर 6-5 असा 4ः30 मि. राखून एक गुणाने विजय मिळवला. कोल्हापूरच्या स्नेहा (3ः00, 3ः10 मि. संरक्षण), ऋतुजा (2ः10 मि. संरक्षण), वैष्णवी (2ः40, नाबाद 1ः50 मि. संरक्षण) यांच्या खेळीच्या जोरावर विजय मिळवला. तर पराभूत पश्चिम बंगालच्या नांक्षिता रॉयने (1ः40, 1ः50 मि. संरक्षण) जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला.



























































