अबब! अल्पवयीन मुलीच्या पोटातून काढला 210 सेमीचा केसांचा गोळा, जयपूरच्या डॉक्टरांची कौतुकास्पद कामगिरी

जयपूरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षाच्या मुलीच्या पोटात दुखत होते. पालकांनी तिला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तिच्या विविध तपासण्या केल्या. यानंतर पोटात जे दिसले ते पाहून डॉक्टरही अवाक् झाले. डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून मुलीच्या पोटातून तब्बल 210 सेंटीमीटर लांबीचा केसांचा गोळा बाहेर काढला.

आग्रा येथील रहिवासी असलेल्या दहावीच्या विद्यार्थिनीला एक महिन्याहून अधिक काळ पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होत होता. यामुळे घरच्यांनी तिला जयपूरमधील रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता नाभीच्या वरच्या भागात पोटात एक गाठ असल्याचे दिसले.

डॉक्टरांनी तात्काळ सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. गॅस्ट्रोटॉमी दरम्यान केसांचा गोळा पोटापासून लहान आतड्याच्या आत पसरलेला पाहून डॉक्टरांना धक्का बसला. केसांचा गोळा एका तुकड्यात काढणे हे एक मोठे आव्हान होते. जर केस तुटले असते तर डॉक्टरांना आतड्यात अनेक चीरा माराव्या लागल्या असत्या. डॉ. जीवन कांकरिया यांच्या नेतृत्वाखाली ही गुंतागुंतीची यशस्वी शस्त्रक्रिया करत अखेर मुलीच्या पोटातून केसांचा गोळा बाहेर काढण्यात आला.

ही मुलगी गेल्या अनेक वर्षांपासून माती, लाकडी तुकडे, धागा आणि खडू यासारख्या वस्तू खात होती. डॉक्टरांच्या मते, ही सवय पिका नावाच्या मानसिक आजाराशी संबंधित आहे. ही केस आतापर्यंत काढलेल्या सर्वात लांब ट्रायकोबेझोअर म्हणून नोंदवली जाईल, असे डॉक्टरांनी सांगितले.