प्रयागराजच्या माघ मेळाव्यात पुन्हा अग्नीतांडव, 24 तासांतील दुसरी घटना

प्रयागराजमधील माघ मेळ्यात बुधवारी पुन्हा आगीची घटना घडली आहे. मेळाव्याच्या सेक्टर 4 मध्ये ही आग लागली. या आगीत दोन तंबू जळून खाक झाले. मिळालेल्या माहितीनुसार, संगम लोअर परिसरात उभारलेल्या छावण्यांमध्ये ही आग लागली. अनेक मोठ्या आणि लहान ब्रह्माश्रम तंबूंना या आगीचा फटका बसला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या तात्काळ घटनास्थळी झाल्या. अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आग कशामुळे लागली याबाबत तपास सुरू आहे. आगीनंतर प्रशासन आणि मेळा आयोजकांनी सुरक्षा आणि दक्षता वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरळीत सुरू आहे.

गेल्या 24 तासांतील आगीची ही दुसरी घटना आहे. मंगळवारी संध्याकाळी सेक्टर 5 मधील नारायण शुक्ल धाम छावणीत आग लागली होती. या आगीत 15 तंबू आणि 20 दुकाने जळून खाक झाली होती. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज आहे.