धक्कादायक! विम्याच्या पैशासाठी नवविवाहित पत्नीची हत्या करून अपघाताचा बनाव, आरोपी पतीला अटक

life-insurance

पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. विम्याच्या पैशासाठी पतीने नवविवाहित पत्नीची हत्या करून अपघाताचा बनाव केला. मात्र त्याचा बनाव उघडकीस येताच पोलिसांनी पतीला बेड्या ठोकल्या. सेवंती कुमारी असे मयत पत्नीचे तर मुकेश कुमार मेहता असे आरोपी पतीचे नाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुकेश कुमार आणि सेवंती यांचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. 9 ऑक्टोबर रोजी हे जोडपे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 33 च्या पद्मा-इटखोरी भागात जखमी अवस्थेत आढळले. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठत जोडप्याला रुग्णालयात नेले.

रुग्णालयात पत्नीला मृत घोषित करण्यात आले. तर पतीला वरवर झालेल्या जखमांवर उपचार सुरू करण्यात आले. पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालानंतर पतीचा बनाव उघडकीस आला. 30 लाख रुपयांच्या विम्याच्या पैशासाठी पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे उघडकीस येताच पोलिसांनी पतीला अटक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.