आपले सामर्थ्य दाखवूया… चला मतदान करू या! मास्टर ब्लास्टरकडून खास शैलीत मतदानाचे आवाहन

लोकसभेच्या निवडणुका सध्या लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा होत आहेत. या निवडणुकीत सर्वांनी मतदान करावे आणि मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोगाकडून जनजागृतीसह अनेक उपक्रम हाती घेण्यात आले. तसेच अनेक सेलिब्रिटींनीही जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. लोकसभेच्या आतापर्यंत झालेल्या चार टप्प्यात मतदानाची टक्केवारी कमी होती. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न होत आहे. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने खास शैलीत मतदानाचे आवाहन केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. हा राज्यातील मतदानाचा शेवटचा टप्पा आहे. यात मुंबईतील सर्व सहा जागांचा समावेश आहे. मुंबई आणि राज्यात मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी टिम इंडियाचा माजी खेळाडू, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या शैलीत मतदारांना मतदानासाठी आवाहन केले आहे. याबाबत त्याने एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, एखाद्या सामन्यामध्ये प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमीच जिंकेल असे काही नाही. पण, लोकशाहीत हे असेच घडत असते. अर्थात लोकांनी ज्याला सर्वाधित मतदान केले असते त्याचा विजय होत असतो. म्हणूनच आपण जनता किती सामर्थ्यवान आहोत हे दाखवूया… चला मतदान करूया., असे सचिनने पोस्टमध्ये म्हटले आहे.

सोमवारी पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 जागांसाठी मतदान होत आहे. त्यात मुंबईच्या सहा जागांसह ठाणे, कल्याण आणि नाशिक मतदारसंघाचा समावेश आहे. पहिल्या चार टप्प्यात मतदानाची टक्केवारी कमी होती. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सेलिब्रिटींसह अनेकजण मतदानासाठी आवाहन करत आहेत.