वीजपुरवठा खंडित झाल्याने कुटुंबीय रात्री घराबाहेर झोपले, भरधाव डंपरने पाच जणांना चिरडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने घराबाहेर झोपलेल्या कुटुंबाला भरधाव डंपरने चिरडले. यात वडिलांसह तीन मुलांचा मृत्यू झाला असून आई गंभीर जखमी आहे. जखमी महिलेला उपचारासाठी लखनौ येथील डॉ. राम मनोहर लोहिया वैद्यकीय विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, फतेहपूर-महमूदाबाद रस्त्यावरील झांसा गावात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने गावातील रहिवासी असलेले नीरज आपल्या तीन मुलांसह आणि पत्नीसह घराबाहेर झोपले होते. यावेळी भरधाव डंपरने आधी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक दिली आणि नंतर कुटुंबाला चिरडले.

हा अपघात इतका भीषण होता की, नीरज आणि त्यांच्या 13 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर 10 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षांच्या मुलाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर नीरजची पत्नी आरती गंभीर जखमी झाली असून, प्रथमोपचारानंतर तिला लखनौ येथील डॉ. राम मनोहर लोहिया वैद्यकीय विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत नीरज भाड्याची मॅजिक व्हॅन चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.