
तिरंगा उतरवताना वीजेचा धक्का लागल्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. एका खासगी कोचिंग सेंटरमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ओम प्रकाश द्विवेदी असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.
77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवारी सकाळी ओडिशातील जगतसिंहपूर जिल्ह्यात एका खासगी कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांनी तिरंगा फडकवला. सायंकाळी तिरंगा उतरवत असताना लोखंडाचा पाईपाचा उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाला. यामुळे झेंडा उतरवणाऱ्या ओमला वीजेचा धक्का बसला आणि तो जागीच कोसळला. स्थानिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच कुजांग पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. कोचिंग सेंटरचे मालक अश्विनी कुमार नंदा यांना ताब्यात घेण्यात आले आहे. राष्ट्रध्वज फडकवताना आणि उतरवताना सुरक्षा मानकांचे पालन का केले गेले नाही याचा तपास पोलिस करत आहेत.




























































