नाल्यावरून क्षुल्लक वादातून गोळीबार, निवृत्त सीआयएसएफ जवानासह दोघांचा मृत्यू; एक जखमी

नाल्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारात निवृत्त सीआयएसएफ जवानासह दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अजयपाल (55) आणि 22 वर्षीय दीपांशू अशी मयतांची नावे आहेत. घटनेनंतर आरोपी पळून गेले. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

ग्रेटर नोएडातील सेथली गावात सोमवारी सकाळी ही घटना घडली. दोन दिवसांपूर्वी प्रिन्स आणि दीपांशूमध्ये नाल्याच्या बांधकामावरून वाद झाला होता. यानंतर सोमवारी सकाळी प्रिन्सच्या बाजूचे काही लोक गावात आले आणि त्यांनी दीपांशूवर गोळीबार केला. यात दीपांशूसह निवृत्त सीआयएसएफ जवान अजयपाल यांचा मृत्यू झाला तर एक तरुण जखमी झाला.

या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्तारोको केला. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून ग्रामस्थांना नाकाबंदी हटवण्यास सांगितले आणि परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. पीडिताने दिलेल्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी अनेक पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत.