कुस्तीपटूंचा अल्टिमेटम संपला, आता महापंचायतचा महाफैसला; मंगळवारी इंडिया गेटवर कॅण्डल मार्च, 28 मे रोजी संसदेत महिलांची महापंचायत

राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष (डब्ल्यूएफआय) बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप करत देशातील मल्लांनी 23 एप्रिलपासून जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला आता महिना होत आला तरी बृजभूषण यांच्यावर कुठलीच कारवाई झालेली नाही. आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी ब्रीजभूषण यांच्यावर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारला 20 मेपर्यंत अल्टिमेटम दिला होता. तो अल्टिमेटम संपल्यामुळे कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ खाप महापंचायतचा हरयाणात रविवारी महाफैसला झाला. आता मंगळवारी दिल्लीतील इंडिया गेटवर कॅण्डल मार्च काढून कुस्तीपटूंना समर्थन दिले जाईल. त्यानंतर 28 मे रोजी नव्या संसद भवनात महिलांची खाप महापंचायत भरणार आहे.

हरयाणातील रोहतकमध्ये झालेल्या खाप महापंचायतमध्ये हरयाणा, उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतील खाप प्रतिनिधीही हजर होते. शेतकरी नेते राकेश टिपैत यांच्यासह आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी या महापंचायतला हजेरी लावली. रविवारी सकाळी 11 वाजता सुरू झालेली ही खाप महापंचायत सायंकाळी 4 वाजेपर्यंत चालली. या महापंचायतमधील निर्णयानुसार इंडिया गेटवर मंगळवारी होणाऱया पॅण्डल मार्चमध्ये देशभरातील नागरिक सहभागी होतील. संसद भवनातील महिलांच्या महापंचायतमध्येही देशभरातील महिलांसह खाप व शेतकरी नेतेही उपस्थित राहणार आहेत. बृजभूषण सिंह यांची नार्को टेस्ट करण्याची मागणीही या महापंचायतमध्ये करण्यात आली.

महिला कुस्तीपटूंना दिली मंथराची उपमा

‘डब्ल्यूएफआय’चे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनीही आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंविरुद्ध गरळ ओकण्याचे काम सुरूच ठेवले आहे. ‘15 रुपयांचे पदक काय परत करता, त्याऐवजी रोख बक्षीस मिळालेले कोटय़वधी रुपये परत करा,’ अशा शब्दांत बृजभूषण यांनी कुस्तीपटूंना डिवचले होते. आता त्यांनी ‘यूटय़ूब’वर मुलाखत देताना आंदोलनकर्त्या महिला कुस्तीपटूंना मंथराची उपमा दिली आहे. मंथरामुळे प्रभू रामचंद्राला 14 वर्षे वनवास भोगावा लागला होता, मात्र राम वनवासाला गेले नसते तर केवटशी गाठ पडली नसती, शबरीची उष्टी बोरे खाता आली नसती, हनुमान-सुग्रीव यांच्याशी मैत्री झाली नसती आणि रावणासारख्या महापापी राक्षसाचा अंतही झाला नसता. कदाचित देवालाही माझ्याकडून अशीच काहीतरी कामे करून घ्यायची असतील, असा इशारा बृजभूषण सिंह यांनी आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंना दिला आहे.

कुस्तीपटूंना आयपीएल सामना बघू दिला नाही

नवी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलनाला बसलेले काही कुस्तीपटू शनिवारी चेन्नई सुपरकिंग्ज व दिल्ली कॅपिटल्सदरम्यानचा आयपीएल टी-20 क्रिकेट सामना बघण्यासाठी अरुण जेटली स्टेडियमवर आले होते. त्यांच्याकडे तिकिटेही होती, मात्र तरीही दिल्ली पोलिसांनी बजरंग पुनिया, साक्षी मलिक व विनेश फोगाट यांना सामना बघू दिला नाही. आम्ही प्रेक्षकांमध्ये बसून शांतपणे क्रिकेटचा सामना बघण्याचा आनंद घेणार होतो, मात्र पोलिसांनी स्टेडियममध्ये जाऊ न दिल्याने आम्हाला सामना न बघताच जंतरमंतरवर माघारी जावे लागले, असे कुस्तीपटूंनी सांगितले.

 रविवारी योगेंद्र यादव यांनी कुस्तीपटूंची भेट घेऊन पाठिंबा दिला.