नॅचरल्स आइस्क्रीमचे सर्वेसर्वा रघुनंदन कामत यांचं निधन

व्यावसायिक क्षेत्रात नॅचरल्स आइस्क्रीम या आपल्या लोकप्रिय ब्रँडने ओळख मिळवणारे रघुनंदन कामत यांचं निधन झालं आहे. ते 70 वर्षांचे होते. नॅचरल्स आइस्क्रीमने सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे. त्यांच्या निधनानंतर रविवारी दिवसभर नॅचरल्सचे आउटलेट बंद राहतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

एका सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेल्या कामत यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरावा असा आहे. कारण कोणतेही कृत्रिम रंग न वापरता अस्सल पदार्थ वापरून तयार केलेलं आइस्क्रीम म्हणून नॅचरल्स आइस्क्रीमने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. रघुनंदन कामत यांचा जन्म कर्नाटकच्या मंगळुरू येथे झाला. त्यांचे वडील श्रीनिवास कामत हे फळविक्रेते होते. रघुनंदन कामत यांना पाच भावंडं होती. लहानपणी शिक्षणासोबत त्यांनी वडिलांचा फळांचा व्यवसायही सांभाळायला सुरुवात केली.

हा अनुभव त्यांना चांगलाच उपयोगी पडला. फळांचा दर्जा त्यांना सहजी कळू लागला. वयाच्या 14 वर्षी ते मुंबईत आले, त्यावेळी त्यांनी आपल्या भावाच्या हॉटेलमध्ये काम केलं. काहीतरी वेगळं करण्याच्या महत्त्वाकांक्षेपायी त्यांनी नॅचरल्स आइस्क्रीमची स्थापना केली. कोणतेही कृत्रिम रंग, चव न वापरता अस्सल फळांचा वापर करून त्यांनी या आइस्क्रीमची निर्मिती केली आणि अल्पावधीतच त्यांचा ब्रँड 400 कोटींवर पोहोचवला.