नवी मुंबई विमानतळ सुरू करण्याच्या हालचालींना वेग, इमिग्रेशन चेकपोस्ट निर्मितीला सुरुवात

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. त्यासाठी इमिग्रेशन चेकपोस्टच्या निर्मितीला सुरुवात झाली असून या चेकपोस्टसाठी 285 पोलिसांची पदे भरण्यास गृह विभागाने मान्यता दिली आहे. या विमानतळाचे 96 टक्के काम पूर्ण झालेले आहे. आता सप्टेंबरमध्ये विमानतळाचा पहिला टप्पा सुरू करण्याची योजना आखली आहे.

सप्टेंबर महिन्यात उड्डाण

दोन आठवडय़ांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विमानतळाच्या कामाची पाहणी केली होती. या विमानळाचे फक्त सहा टक्के काम शिल्लक राहिले असून सप्टेंबर महिन्यात पहिले प्रवासी विमान या विमानतळावरून झेपावेल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.

नवी मुंबई विमानतळावर मागील ऑक्टोबर महिन्यात हवाई दलाच्या वाहतूक विमानाचे यशस्वी लॅण्डिंग करण्यात आले होते. तसेच इंडिगो एअरलाईन्सच्या एअरबस विमानाचे डिसेंबर महिन्यात या विमानतळावर पहिले व्यावसायिक लॅण्डिंग यशस्वीरीत्या पूर्ण केले होते.

असा असेल विमानतळ

या विमानतळावर चार प्रवासी टर्मिनल, दोन रनवे, एक कार्गो ट्रक टर्मिनल व इतर महत्त्वाच्या संरक्षण व नागरी हवाई वाहतुकीशी संबंधित विभाग
होणार आहेत.

प्रवासी क्षमता

हा विमानतळ दोन टप्प्यात कार्यान्वित होणार आहे. विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर दरवर्षी 360 कोटी मेट्रिक टन मालाची चढउतार होईल, तर दरवर्षी 9 कोटी प्रवाशांची ये-जा विमानतळावरून होईल.

पोलीस पदांची निर्मिती

या विमानतळावर इमिग्रेशन चेकपोस्ट तयार होणार आहे. त्यासाठी एकूण 285 पदे नव्याने निर्माण करण्याचा प्रस्ताव गृह विभागाने तयार करून सरकारला सादर केला होता. या पदांच्या निर्मितीसाठी 10 कोटी 10 लाख 88 हजार रुपयांच्या खर्चास सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.