
संपूर्ण देशाला अभिमान वाटेल, असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्यदिव्य विमानतळ नवी मुंबईत होत आहे. या विमानतळाला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले असून केंद्राकडे राज्य सरकारने प्रस्ताव पाठवावा, अशीही मागणी केली आहे.
देशभरात विविध राज्यांमध्ये बांधलेल्या विमानतळाला त्या भागातील महान नेत्यांचे नाव देण्यात आले आहे. केवळ महाराष्ट्र व हिंदुस्थानात नव्हे तर संपूर्ण जगभरातील मराठी माणसांना आत्मभान देणाऱया शिवसेनाप्रमुखांचे नाव नवी मुंबईच्या विमानतळाला द्यावे, अशी तमाम शिवसैनिकांची इच्छा असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ या नामकरणाचा प्रस्ताव तातडीने केंद्र सरकारला पाठवून योग्य तो पाठपुरावा करावा, अशी विनंती पालकमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.





























































