
दहा रुपयांचा शिक्का नको, नोट पाहिजे या क्षुल्लक कारणावरून माथेफिरू प्रवाशाने नवी मुंबई परिवहनच्या कंडक्टरच्या मानेवर, चेहऱ्यावर ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना पनवेलजवळ घडली. या घटनेत कंटक्टर रामेश्वर ईप्पर (25) गंभीर जखमी झाले असून प्रवासी तन्मय कवठेकरला पोलिसांनी अटक केली.
नवी मुंबई परिवहनची क्रमांक 50 ची बस शनिवारी रात्री कोपरखैरणेवरून पनवेलकडे जात होती. यावेळी प्रवासी कवठेकरचे कंटक्टर ईप्पर यांनी नऊ रुपयांचे तिकीट फाडले. कवठेकरने 20 रुपयांची नोट दिल्याने वाहकाने त्याला 10 रुपयांचा शिक्का व एक रुपया दिला. मात्र 10 रुपयांचा शिक्का नको नोटच पाहिजे यावर प्रवासी अडून राहिला आणि हुज्जत घालू लागला. त्यानंतर अचानक खिशातून ब्लेड काढून त्याने ईप्परच्या मानेवर, चाऱ्यावर वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत जखमी ईप्परला रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतर प्रवाशांनी माथेफिरूला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

























































