आधी चिमुरड्याचा गळा चिरला; नंतर डबक्यात बुडवून मारले, 10 वर्षांच्या मुलाच्या हत्येने उरण हादरले

दहा वर्षीय मुलाच्या निघृण हत्येने उरण हादरले आहे. सुरक्षारक्षकाने लहान मुलांना कंपनीत नो एण्ट्री असल्याचे सांगितल्याने पित्याने मुलाला आपल्या जवळच्या मित्राकडे मोठ्या विश्वासाने सोपवून त्याला घरी सोडण्यास सांगितले. मात्र क्रूरकर्मा निघालेल्या मित्राने या चिमुरड्याचे अपहरण करत त्याचा गळा चिरला, परंतु हे लेकरू त्यानंतरही जिवंत राहिल्याने आरोपी कांताराम यादव याने हर्ष यादव याला फरफटत नेत एका डबक्यात बुडवून मारले.

हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने संताप व्यक्त होत असून पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपासाची चक्रे फिरवून क्रूरकर्मा कांतालालच्या काही तासातच मुसक्या आवळल्या.

हर्ष यादव याचे वडील बिंदू यादव व कांतालाल हे दोघेही व्यवसायाने चालक असून ते दोघेही उरणच्या चिर्ले गावात एकाच चाळीत भाड्याने राहतात. बिंदू यादव याची पत्नी मूळ गावी उत्तर प्रदेशमध्ये गेल्याने बिंदू व त्याचा मुलगा हर्ष हे दोघेच सध्या येथे राहतात.

चौथीत शिकणाऱ्या हर्षने हट्ट केल्याने बिंदूने त्याला आपल्यासोबत कंपनीत नेले, परंतु गेटवरील सुरक्षारक्षकाने लहान मुलांना कंपनीत प्रवेश नसल्याचे सांगितले. त्यामुळे आता काय करावे असा प्रश्न बिंदूला पडला. त्याचवेळी शेजारी राहणारा कांतालाल समोर दिसला. त्यामुळे बिंदूने मोठ्या विश्वासाने आपल्या मुलाला त्याच्याकडे सोपवले आणि कृपया हर्षला घरी सोड अशी विनंती केली.