नवी मुंबईत चार लाख बेकायदा पत्रके जप्त,शिवसेनेने उधळला डाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नवी मुंबई

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उद्ध्वस्त झालेल्या बावखळेश्वर साम्राज्यावर शिवसेनेने हातोडा चालवला, असा कांगावा करून मतदारांची दिशाभूल करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव शिवसेनेने शनिवारी हाणून पाडला. बावखळेश्वरच्या कारवाईचा बाऊ करून नवी मुंबईकरांची सहानुभूती मिळविण्यासाठी छापण्यात आलेली चार लाख बेकायदा पत्रके शिवसैनिकांनी पकडली आणि पोलिसांच्या ताब्यात दिली. जाहीर प्रचार संपण्यास काही तासांचा कालावधी उरलेला असताना झालेल्या या खोडसाळपणाची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.

माजी मंत्री गणेश नाईक यांच्या कृपाशीर्वादाने पावणे एमआयडीसीत उभे करण्यात आलेल्या बावखळेश्वर हे अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक ऍड.संदीप ठाकूर यांनी याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने हे अनधिकृत साम्राज्य हटविण्याचे आदेश दिले. हे वास्तव असतानाही बावखळेश्वर शिवसेनेमुळेच पडले असा राग राष्ट्रवादीकडून आळवला जात आहे. बावखळेश्वरच्या नावाने मते मागण्यासाठी राष्ट्रवादी काही आक्षेपार्ह पत्रक वाटणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्यराव, दिलीप घोडेकर, शहरप्रमुख प्रवीण म्हात्रे, उपशहरप्रमुख सुमित्र कडू, विभागप्रमुख महेश बनकर, समीर बागवान, दर्शन भणगे, शिरीष पाटील यांनी पहाटेपासून फिल्डिंग लावून ही पत्रके पकडली. राष्ट्रवादीच्या या खोडसाळ वृत्तीचा शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर निषेध केला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, आरपीआयचे नेते सिद्धराम ओव्हळ, उपजिल्हाप्रमुख अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.

निवडणूक आयोग कारवाई करणार

शिवसेनेची प्रतिमा मलिन करण्यासाठी तयार करण्यात आलेली ही पत्रके अभिजित इंटरप्राईजेस ऍण्ड ऍडव्हर्टाजिंगमध्ये छापण्यात आली आहे. याप्रकरणी सानपाडा आणि नेरुळ पोलीस ठाण्यांसह निवडणूक आयोगाकडेही तक्रार करण्यात आली आहे. हे पत्रके वाटणाऱयांवर आणि छापणाऱयांवर कडक कारवाईचे आश्वासन निवडणूक आयोगाने दिले आहे, असे शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी सांगितले.