पोलीस उपनिरीक्षकाचा महिला पोलिसावर बलात्कार, सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी मुंबई

नवी मुंबई पोलीस दलातील एका पोलीस उपनिरीक्षकाविरोधात महिला पोलिसावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला आहे. अमित शेलार असे आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून तो फरार आहे. आरोपीने पीडितेला ज्यूसमधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. तसेच त्याचा व्हिडिओ बनवून त्याच्या आधारे पीडितेला ब्लॅकमेल करून सतत बलात्कार करत असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी मध्यरात्री सीबीडी पोलीस ठाण्यात आरोपी अमित शेलारविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शेलार आणि पीडित महिला शिपाई एकाच पोलीस ठाण्यात नियुक्त असताना दोघांची ओळख झाली होती. ओळखीचा फायदा घेऊन मार्च 2017 मध्ये आरोपीने पिडीतेला ज्यूसमधून गुंगीचे औषध दिले होते. ती बेशुद्ध असताना तिच्यावर अतिप्रसंग केला. एवढंच नाही तर त्याने पिडीतेची अश्लील व्हिडिओ क्लिप बनवून ब्लॅकमेल करत तिच्यावर सतत बलात्कार करत होता. मार्च 2017 पासून 13 नोव्हेंबर 2018 पर्यंत शोलार  सातत्याने बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकाराला कंटाळून तिने पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणी सीबी़डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अद्याप आरोपी पोलीस उपनिरीक्षक अमित शेलार याला अटक झालेली नाही.