हनुमान चालिसाचे पठण सरकार करू देत नसल्याचे चित्र उभे केले जात आहे, राज्य सरकारचा न्यायालयात दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दांपत्याच्या जामीन अर्जाला राज्य सरकारने सत्र न्यायालयात आज जोरदार विरोध केला. ‘मातोश्री’वर जाऊन हनुमान चालिसा पठण करू नका असे बजावूनही राणा दांपत्याने त्याचे पालन केले नाही. धर्म हा संवेदनशील विषय असून हनुमान चालिसाचे सरकार पठण करू देत नसल्याचे चित्र उभे केले जात आहे, असा जोरदार युक्तिवाद सरकारच्या वतीने करण्यात आला. दरम्यान, राणांच्या अर्जावरील युक्तिवाद पूर्ण झाला असून सोमवारी सत्र न्यायालयात त्यावर निकाल सुनावणार आहे.

मुंबई पोलिसांनी राणा दांपत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला असून राणा दांपत्याने मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर आज न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जोरदार युक्तिवाद करत राणा दांपत्याचा अर्ज फेटाळून लावण्याची मागणी केली.