भाजपला लागलेली उतरती कळा आता कोणीही थांबवू शकत नाही – शरद पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sharad-pawar

छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्रानंतर झारखंड या पाचव्या राज्यांतील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ता, प्रचंड संपत्ती यासह विविध मार्गांनी सत्ता हातात ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला. मात्र नरेंद्र मोदींच्या अहंकारी राजकारणाला झारखंडच्या जनतेने नाकारले त्याबद्दल तेथील जनतेचे अभिनंदन करतो. भाजपला वर्षा-दोन वर्षांत जी उतरती कळा लागली आहे ती आता कोणीही थांबवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केली.

झारखंडच्या निकालाबाबत शरद पवार यांनी ‘सिल्व्हर ओक’ येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळी शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राने देशाला जी वेगळी दिशा दाखवली आहे त्या दिशेने हातात हात घालून जाण्याचा निर्णय झारखंडच्या आदिवासीबहुल जनतेने घेतला आहे. त्या दिशेने पाऊल टाकताना झारखंडमध्येही काही राजकीय पक्ष एकत्र आले आणि त्याचा त्यांना फायदा झाला. यामुळे आता अन्य राज्यांतही विश्वास निर्माण होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही झारखंडमध्ये पाच जागा लढवल्या. त्यापैकी एक जागा जिंकली आहे.

अर्थव्यवस्था धोक्यात आल्याने जनतेत नापसंती

पाच राज्यांत भाजपला आलेल्या अपयशामागे केंद्र सरकारने या देशातलं अर्थकारण योग्य पद्धतीने हाताळलं नाही हे कारण आहे. अर्थव्यवस्था संकटात आली आहे. मंदीचं चित्रं दिवसेंदिवस वाढत आहे. या देशातलं गुंतवणुकीचं वातावरण कमी व्हायला लागलं असून या सर्वांचा परिणाम संपूर्ण देशावर झाला आहे. त्याची किंमत सर्वसामान्य नागरिकाला मोजावी लागत आहे. त्यामुळे या सरकारबद्दल जनतेच्या मनात एक नापसंती निर्माण झाली आहे, असे शरद पवार म्हणाले.

विरोधी पक्षातील भाजपला फारच लवकर कंठ फुटतोय!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वारंवार होत असलेल्या टीकेचाही शरद पवार यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, सरकारचे 15 दिवसही झालेले नाहीत. निर्णय घेऊन दोन दिवसही झालेले नाहीत. ज्यांनी निर्णय घेण्यासंदर्भात घोषणा केल्या होत्या त्यांनी काहीही केलेलं नाही. त्यांना तातडीने या सर्व गोष्टी दिसायला लागल्या आहेत. मला वाटतंय की, त्यांना फारच लवकर कंठ फुटतोय. जरा थांबा, परिस्थिती बघा, फील्डवर काय होतंय ते बघा. दोन लाखांची कर्जमुक्ती देण्याचं महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. जसजसे दिवस जातील तसतशी आर्थिक परिस्थिती बदलेल. तेव्हा आणखीही हातभार लावल्याशिवाय सरकार राहणार नाही. शेतकऱयांना दारिद्र्यातून बाहेर काढायचं हा निर्धार या सरकारने केलेला आहे आणि आमचा त्यांना पाठिंबा आहे, असेही पवार म्हणाले.

पंतप्रधानांचं वक्तव्य आश्चर्यकारक

पंतप्रधानांचं एनआरसीबाबत वक्तव्य वाचून आश्चर्य वाटलं. त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं आहे की, या विषयावर मंत्रिमंडळात चर्चा केली नाही तसेच संसदेत चर्चा केली नाही. पण प्रफुल्ल पटेल तसेच मी असे आम्ही दोघेही राज्यसभेत हजर होतो. प्रफुल्ल पटेल यांनी या चर्चेत भागही घेतला होता. त्याला उत्तर देताना देशाच्या गृहमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की, एनआरसी आम्ही देशभरात लागू करण्याचा विचार करीत आहोत. त्याचप्रमाणे याच वर्षी संसदेच्या अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात एनआरसी कायदा देशभरात आणण्याची भूमिका घेतली असल्याचे सांगितले होते. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण म्हणजे पंतप्रधान जे सांगतात आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यामध्ये फरक आहे, असे पवार म्हणाले.