
सामना ऑनलाईन । पुणे
माझं घर भरलेलं आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरात कुणी आहे का हे देशालाही माहीत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी लगावला. शरद पवार यांच्या घरामध्ये वाद असल्याची टीका पंतप्रधानांनीं नुकतीच केली होती, त्याला पवारांनी आज खरमरीत शब्दांत उत्तर दिले.
वर्धा येथे झालेल्या सभेत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांच्या घरात वाद असल्याचे म्हटले होते. तोच धागा पकडून पवार यांनी मोदींवर निशाणा साधला. माझ्या घरापासून वर्धा 400-500 किलोमीटर दूर आहे. तिथल्या सभेत हे माझ्या घराबाबत बोलतात, घरात भांडण आहे असं सांगतात, ते त्यांना कसं कळलं असा सवालही पवार यांनी उपस्थित केला. आम्ही सगळे भाऊ वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो. भांडणाचा प्रश्न येतो कुठे, हे मोदी भेटतील तेव्हा त्यांना सांगेन, असेही ते म्हणाले.




























































