शरद पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन; बळीराजासाठी विठुरायाला घातले साकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पंढरपूर दौऱ्यावर असताना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे. यावेळी राज्यातील बळीराजाच्या सुखसंपन्नतेसाठी त्यांनी विठुरायाला साकडे घातले आहे. सुमारे 6 वर्षांनंतर शरद पवार विठुरायाच्या दर्शनासाठी आले आहेत. 2017 नंतर शरद पवार विठुचरणी आले होते.

आपण देशात फार ठिकाणी मंदिरात जात नाही. काही मंदिर ही माझ्या अंत:करणात आहेत. त्यामध्ये पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीचं मंदिरसुद्धा आहे. विठ्ठलाच्या दर्शनाने मानसिक समाधान मिळते, असे त्यांनी सांगितले. विठ्ठल हा देशातील कष्टकरी सर्वसामान्यांचा दैवत आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून उन्हातान्हाचा विचार न करता, दर्शनासाठी याठिकाणी लोक येतात. त्यामुळे सामान्य माणसाला समाधान देणारे हे मंदिर आहे. मंदिरात मी येत असतो, पण त्याचा प्रचार करत नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

या दौऱ्यात पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे 2024 साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी अभिजीत पाटील हे पंढरपूर-मंगळवेढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.