‘थकलेल्या’ काँग्रेस-राष्ट्रवादीचं विलिनीकरण? सुशीलकुमार शिंदेंचं सूचक विधान

29589

विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रचारसभांचा वेग आता वाढताना दिसत आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेना महायुतीसह प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. दोन्ही पक्षांची आघाडी झाली असून विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी दोन्ही पक्षांना लागलेले पक्षांतराचे ग्रहण आता ओसरू लागले आहे. पक्षांतरामुळे दोन्ही पक्षांची ताकद कमी झाली आहे अशी चर्चा सुरू असतानाच माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सूचक विधान केले आहे.

सोलापूर शहर उत्तरचे राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सपाटे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी माजी सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचे संकेत दिले आहेत. भर सभेमध्ये सुशीलकुमार शिंदे यांनी सूचक विधान केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात 3239 उमेदवार, वाचा कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार

सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आज जरी वेगळी असली तरी एकाच झाडाखाली वाढलेले पक्ष आहेत. भविष्यात आम्ही जवळ येणार आहोत. काँग्रेस एकत्रित होणार आहे, असे संकेत त्यांनी दिले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघेही थकलेले आहेत. आम्ही दोघे कधीकाळी एका आईच्या मांडीवर वाढलेलो आहोत. इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व घेऊन पुढे आलो आहोत. त्यामुळे आमच्याही मनात खंत आहे, त्यांच्याही मनात खंत असेल, पण ते बोलून दाखवत नाहीत. ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस ते करतील. पण त्याची सुरुवात विधानसभेच्या निमित्ताने सोलापुरातून एकत्र येऊन काम करत असल्याबद्धल त्यांनी समाधान व्यक्त केले.

‘सत्तेत आल्यास तीन महिन्यात सातबारा कोरा करू, अन्यथा पवारांची औलाद म्हणून सांगणार नाही’

शरद पवार आणि माझ्या मैत्रीत अनेकांनी घोळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये कोणाला यश आले नाही. कसे वागावे आणि कसे डावपेच करावेत याची धडे शरद पवारांनी आपणास दिले आहे. मीसुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन चालत असताना सामाजिक कार्यकर्ता, सामान्य आणि गरीब घरातील नगरसेवक बाबा मिस्त्री यांना सोलापूर दक्षिणची उमेदवारी दिली आहे. मिस्त्री यांच्यासह आमदार प्रणिती शिंदे आणि राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे त्यांनी सांगितले.

आव्हाड आणि सावंत यांची प्रतिक्रिया
सुशीलकुमार शिंदे यांच्या सूचक विधानावर राष्ट्रवादीचे नेते आणि काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिटलरशाहीला रोखण्यासाठी देशातील सर्वच पक्ष एकत्र येणार असेल तर चांगली गोष्ट आहे, असे आव्हाड म्हणाले. तर हे त्यांचे वैयक्तीक मत आहे. यामागे राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची भावनाही असेल, परंतु आम्ही सध्या एकत्र लढत आहोत. भविष्य़ातील गोष्ट सोडून आताची लढाई महत्त्वाची आहे. निकाल डोळे दिपवणारे असतील, अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली.

विलीनीकरणाची चर्चा पुन्हा सुरू

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरही शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात भेट झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याची चर्चा सुरू होती, मात्र तेव्हा राष्ट्रवादीने विलीनीकरणाची शक्यता फेटाळून लावली होती. देशातील वातावरण एकाच पक्षाच्या बाजूने वाहत असताना राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण व्हावे असे मत काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत मांडले आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या