नवी मुंबईत राष्ट्रवादी कोसळली, 48 नगरसेवकांसह गणेश नाईक भाजपवासी

1938

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी बुधवारी नवी मुंबई महापालिकेच्या 48 नगरसेवकांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे गेली 19 वर्षे महापालिकेच्या सत्तेत असलेली राष्ट्रवादी काँग्रेस शहरात पूर्णपणे कोसळून पडली आहे. मनगटावरील घडय़ाळ सोडून हातात कमळ घेताना गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात चकार शब्दही काढला नाही, त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

गणेश नाईक यांचा भाजप प्रवेश सोहळा आज सायंकाळी वाशी रेल्वे स्थानक परिसरातील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये पार पडला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या 70 वर्षांत देशात जी कामे झाली नाहीत ती गेल्या पाच वर्षांत झाली. त्यामुळे काम करण्याची इच्छा असलेले नेते भाजपमध्ये येत आहेत. यावर विरोधकांकडून भाजपमध्ये ‘मेगाभरती’ चालली अशी टीका केली जात आहे. त्यांनी आमच्या भरतीची चिंता करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाला लागलेल्या मेगागळतीचे आत्मचिंतन करावे, असाही चिमटा त्यांनी विरोधकांना काढला. याप्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, रायगड जिह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, आमदार मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, महापौर जयवंत सुतार, सुरेश हावरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत आदी उपस्थित होते.

महापौर राष्ट्रवादीतच
गणेश नाईक यांच्याबरोबर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राष्ट्रवादीचे 42 आणि अपक्ष मिळून एकूण 48 नगरसेवकांनी आज स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांसमोर प्रतिज्ञापत्र सादर केले. महापौर आणि स्थायी समिती सभापती ही वैधानिक पदे असल्यामुळे महापौर जयवंत सुतार आणि सभापती नवीन गवते यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही. त्यामुळे महापौर मात्र राष्ट्रवादीचेच राहणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या