किमान शालेय पातळीवरचं अर्थशास्त्र शिका हो….जितेंद्र आव्हाड यांचा भाजपला टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ncp leader jitendra awhad

हिंदुस्थानने 3.5 ट्रिलियन डॉलर जीडीपीचा टप्पा पार केल्यानंतर भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. मात्र, विरोधी पक्षांनी याच मुद्द्यावर सत्ताधारी मोदी सरकारवर आणि भाजपवर टीकास्त्र डागायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. किमान शालेय पातळीवरचं अर्थशास्त्र शिका हो… असे म्हणत आव्हाडांनी भाजपला टोला लगावला आहे.

इंग्लंडचा जीडीपी 3.2 ट्रिलियन आहे. तर हिंदुस्थानचा 3.5 ट्रिलियन झाला म्हणून नगारे पिटणाऱ्यांनो, त्यांना फक्त 6.8 कोटी लोकांचं कल्याण करायचं आहे. आपल्याला 140 कोटी लोकांचं कल्याण करायचं आहे. किमान शालेय पातळीवरचं अर्थशास्त्र शिका हो, असे आव्हाड म्हणाले.

याआधीही आव्हाडांनी आणखी एक ट्वीट करत देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते, देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. प्रथमच देशावरील इतर देशांचे कर्ज अर्थात विदेशी कर्ज एकूण 620.70 अब्ज डॉलर्सवर गेले असून ते परकीय चलन साठ्यापेक्षा अधिक झाले आहे. एकीकडे महागाईने कहर केलेला असताना देशावर मोठ्या प्रमाणावर वाढते कर्ज कशाचे द्योतक आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.