
>> उदय जोशी । बीड
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीनंतर बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना बीड दौऱ्याचे निमंत्रण दिले आणि त्यांनी तात्काळ स्वीकारून बीडला येण्याचा शब्द दिला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राज्यातील नेत्यांची एक बैठक नुकतीच दिल्लीत झाली. या बैठकीत राष्ट्रवादीची मोट बांधण्यावर पवारांनी भर दिला, या बैठकीनंतर शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना भेटण्यासाठी वेळ दिला, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, माजी मंत्री प्रकाश सोळुंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, माजी आमदार पृथ्वीराज साठे आणि संदीप क्षीरसागर यांनी भेट घेतली.
बीड जिल्ह्यात सध्या राजकीय डावपेच आखले जात आहेत. त्यातच शरद पवार बीडमध्ये येणार या बातमीने आणखी चर्चा सुरू झाल्या आहेत. बीडमध्ये उभा राहत असलेल्या एका मोठ्या रुग्णालयाच्या उद्घाटनाचे हे निमंत्रण होते, पवारांनी ते स्वीकारले. त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात शरद पवार हे बीडमध्ये असण्याची शक्यता आहे.
























































