खोटी अ‍ॅट्रॉसिटी रद्द करा, अन्यथा बेमुदत उपोषण; संभाजीसेनेचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

जिंतूर नगर परिषदेतील कर्मचारी दत्तराव तळेकर यांना घरी बोलावून बेदम मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्या सांगण्यावरून खोटी अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्यात आली आहे. ही अ‍ॅट्रॉसिटी रद्द करावी, अन्यथा उद्या 11 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा संभाजीसेनेने जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.

शुक्रवार, 5 जुलै रोजी राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांनी जिंतूर नगरपालिकेचे कर्मचारी दत्तराव तळेकर यांना घरी बोलाविले आणि आर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारहाणही केली. या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवरून गुन्हा दाखल न करता, उलट आमदार भांबळे यांच्या सांगण्यावरुन दत्तराव तळेकर यांच्यावर खोटी अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे दत्तराव तळेकर आणि त्यांचे कुटुंबीय प्रचंड भयभित झाले आहेत. यापूर्वी देखील आमदार भांबळे यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात आणि कर्मचाऱ्यांमध्ये तहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वेळीच आवर घालण्यात यावा, तसेच राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांना अटक करण्यात यावी. तसेच त्यांच्या सांगण्यावरुन करण्यात आलेली खोटी अ‍ॅट्रॉसिटी रद्द करावी, या प्रमुख मागणीसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर संभाजीसेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर, अरुण पवार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर सोळुंके यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.