
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या ईडी व सीबीआय कारवाईवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. जर सीबीआय व ईडी या स्वतंत्र संस्था आहेत तर त्यांच्या कारवाईची माहिती आधीच कशी भाजपला मिळते असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. सुप्रिया सुळे या आज धाराशिव दौऱयावर आल्या होत्या. यावेळी शहरातील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या
”केंद्र सरकार म्हणतं सीबीआय आणि ईडी या स्वतंत्र संस्था आहेत. असं आहे तर एक महिना, एक आठवडा, पंधरा दिवस आधी एका भाजपच्या सदस्याला यांच्या कारवायांची माहिती कशी कळते? म्हणजे ही माहिती लिक होत असेल. जर ती लिक होतेय तर केंद्र सरकारने त्याची माहिती काढली पाहिजे की या बातम्या कशा लिक होतात आणि त्याची कबूली द्यावी. मी संसदेमध्ये आधीही विचारलंय, आता देखील मी अमित शहा यांना विचारणार आहे की तुम्ही म्हणता तुमचं सरकार पारदर्शक आहे मग हे होतंच कसं? महाराष्ट्रातील व देशातील सर्व सामान्य जनतेची फसवणूक हे करत आहेत. ईडी व सीबीआयची ही यांची स्वायतत्ता नाही आहे”, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.



























































