
सामना प्रतिनिधी । पंढरपूर
भाजपचे प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारीना देणेकऱ्यांनी भंडावून सोडले. अनपेक्षितपणे आलेल्या देणेकरांनी थोडीथोडकी नाहीतर चक्क 15 लाख रुपयांची मागणी केली. पैसे घेऊन जाण्यासाठी रिकाम्या पिशव्या घेऊन आलेल्या देणेकऱ्यांची समजूत काढता काढता भंडारीची दमछाक झाली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, माधव भंडारी एका खाजगी कार्यक्रमानिमित्ताने पंढरपूरमध्ये आले होते. हा दौरा समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी रिकाम्या पिशव्या घेऊन शासकीय विश्रामगृहावर हजर झाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी 15 लाख रुपये देतो असे आश्वासन दिले होते. अजून एकही रुपया खात्यावर जमा केलेला नाही.
आज तुम्ही भेटला आहात तर आम्हाला 15 लाख रुपये द्या अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. अचानक आलेल्या या आंदोकांनी भंडारीना भंडावून सोडले. भंडारी पक्षाची बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत होते पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आधी 15 लाख द्या मग बोलू अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.
माझे 15 लाख सोडा 15 रुपये सुद्धा नाहीत. 15 लाख या आश्वासनाविषयी आपला गैरसमज झाला आहे. तो आपण समजून घ्या अशी विनंती भंडारी यांनी केली. भंडारी आणि आंदोलक यांच्यातील आर्थिक व्यवहार काही मिटण्याचे नाव घेईना तेव्हा भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. बराचवेळ वादविवाद झाल्यानंतर परीचारकांच्या मध्यस्थीला यश आले आणि आंदोलक शांत झाले आणि रित्या हातांनी परतले.



























































