मी काय म्हातारा झालो? अजून लई जणांना घरी पाठवायचेय – शरद पवार

3363

सोलापूरच्या स्वाभिमानी जिल्ह्यात लाचारी स्वीकारणाऱ्या नेत्याला लोक जागा दाखवतात. गेलेले नेते इतिहास जमा होणार आहेत. गेलेल्याची नाही तर येणाऱ्यांची चर्चा करा. असे म्हणत सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवारांनी ऊर्जा निर्माण केली. मंगळवारी सोलापूरातील हुतात्मा स्मृती मंदिरात झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

मी लोकांसाठी काय केलं, हे जेलवारी करणाऱ्यांनी विचारू नये; पवारांची शहांवर टीका

पवार पुढे म्हणाले की, माझ्या राजकारणाची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातून झाली. 1965 साली राज्यातील तरुणांचे नेतृत्त्व माझ्याकडे होते. तेव्हा सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी माझाकडे होती. सोलापूर जिल्हा यशवंतराव चव्हाणांच्या विचारावर चालणारा जिल्हा आहे. स्वाभिमानी जिल्ह्यात लाचारी स्विकारणाऱ्या नेत्याला लोक जागा दाखवतात. गेलेल्या लोकांचे नाव कशाला काढता. गेलेले नेते इतिहास जमा होणार आहेत. असे म्हणत मोहिते पाटील, दिलीप सोपलांवर नाव न घेता टीका शरद पवार यांनी केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पवारांवर टीका करताना सोलापूरच्या सभेत म्हणाले होते, शरद पवारांनी काय केले? यावर उत्तर देताना पवार म्हणाले की, शरद पवार बर वाईट केले म्हणून कधी तुरुंगात गेला नव्हता. तुरुंगात गेलेल्यानी सांगू नये की शरद पवारांनी काय केले? मी मुख्यमंत्री असताना सकाळी 7 वाजता किल्लारीत होतो. आजचे राज्यकर्ते पुराचा दौरा हेलिकॉप्टरने दौरा करतात आणि अर्धा तासात गायब होतात. राज्याच्या प्रमुखाने आपत्तीच्या ठिकाणी मुक्कामी राहावे लागते. कारण, त्याशिवाय यंत्रणा हालत नाही.

पवार पुढे म्हणाले की, मी काय म्हातारा झालो? अजून लई जणांना घरी पाठवायचेय. ते कशाच्या जोरावर पाठवायचे? येथे उपस्थित असलेल्या तरुणाईच्या जोरावर पाठवायचेय. म्हणून मी घरी सांगून आलो की, आता घरचे तुमच्या तुम्ही पहा. मला काही लोकांच्याकडे बघायचय, असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या